सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील डीएसके विश्व गृहसंकुलातील चार दुचाकी जळून खाक झाल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. सोमवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास ही आग लागल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. दुचाकींना कोणी आग लावली की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली हे अद्याप अस्पष्ट आहे.
डीएसके विश्वमध्ये असलेल्या भास्कर सोसायटीच्या एफ बिल्डींगच्या पार्किंगमध्ये ही आग लागली. त्यात अँक्टिव्हा, अँक्सिस आणि यामाहा अशा चार गाड्या जळून खाक झाल्या. आगीचे कारण समजू शकले नाही. पण शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या चार गाड्यांसोबतच बाजूला असलेल्या इतरही सहा दुचाकी आणि एका सायकलीला आगीची झळ पोहोचली. सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास अग्निशामक दलाला याची माहिती मिळाली. सुमारे पंधरा मिनिटांत या ठिकाणी पोहोचलेल्या अग्निशामक दलाने अवघ्या दहाच मिनिटात ही आग विझवली. पण तोवर आगीचे लोळ तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते.
एफ बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये समोरासमोर सुमारे पंधरा ते वीस गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यापैकी चार गाड्यांना आग लागली. आगीमुळे धूर पसरताच बिल्डिंगमधील नागरिकांनी शेजारच्या गाड्या ओढून बाजूला केल्या.