दुचाकीचा सतत हॉर्न वाजविल्याची विचारणा केल्याच्या रागातून टोळक्याने चौघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडे अडीच लाखांची खंडणी मागून ५० हजार रूपये ऑनलाईन घेतल्याची घटना रात्री साडेदहाच्या सुमारास कर्वेनगर पुलाखाली घडली.

मंगेश दत्तू कांबळे (वय २९, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर), उमेश सुरेश फाटक (वय १९ रा. कर्वेनगर), संतोष प्रकाश ढेबे (वय २३ रा. दत्तवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रोहन दिलीप वायाळ (वय २१ रा. वारजेनाका) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव घायवत, विशाल होनराव, प्रणीत जोगी, रोहन वायाळ अशी जखमींची नावे आहेत.

रोहन आणि त्याचा मित्र गौरव रात्री सव्वा दहाच्या सुमारास कर्वेनगर परिसरातील स्पेन्सर चौकातून जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेला मंगेश सतत हॉर्न वाचवित होता. त्यामुळे रोहन आणि गौरवने त्याला हॉर्न का वाजवित आहेस, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्यामुळे त्याने दोघांना मारहाण केली. त्यानंतर रोहनचा मित्र विशाल आणि प्रणित हे त्याठिकाणी आले असता, टोळक्याने त्यांना दुचाकीवर बसवून कर्वेनगर पुलाखाली नेले. त्यांना बेदम मारहाण करून तुम्हाला कर्वेनगर भागात राहणे मुश्कील करीन अशी धमकी दिली. भांडणात तुम्ही आमची सोन्याची चेन काढून घेतल्याचा आरोप करीत टोळक्याने त्यांच्याकडे अडीच लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर गुगल पेवर ५० हजार रूपये घेऊन खंडणी घेतली. याप्रकरणी तिन्हीही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी दिली.