पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदीपात्रात १३ हजार ९८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान, आज मध्यरात्री नदीपात्रालगत असलेल्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी पाण्यात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, वेळीच अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी झाल्याने पाच जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. वंचिका लालवाणी (13), प्रिया लालवाणी (२२, कुणाल लालवाणी (28), कपिल लालवाणी (२१) आणि कृष्णा लालवाणी (८) हे सर्व राहणार पालघर अशी पाण्यात अडकलेल्यांची नावे आहेत.

रात्री पावणे दोनच्या सुमारास एस.एम. जोशी पुलाखालील नदी पात्रालगतच्या रस्त्यावरून कुणाल लालवाणी हे कुटुंबियांसमवेत चारचाकी वाहनातून जात होते. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली. या घटनेची माहिती अग्निशामक विभागाच्या नियंत्रण कक्षाला देताच, अग्निशामक विभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अखेर पाच जणांची सुटका करण्यात आली.

पुणे : भिडे पूल पाण्याखाली ; मध्यवर्ती भागातील वाहतूक विस्कळीत, दहा ते पंधरा चारचाकी नदीपात्रात अडकल्या

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीला चारही धरणं ९६ टक्के भरली असून धरणात २७.९९ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सकाळपासून खडकवासला धरणातून १ हजार ७१२ क्युसेकने विसर्ग नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली होती, त्यात दिवसभरात वाढ होत आज पहाटे ४ वाजता १३ हजार ९८१ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्याच दरम्यान नदीपात्रालगत लावण्यात आलेल्या चार चाकी गाड्या अडकून पडल्याच्या घटना काल घडल्या आहेत.