पुणे : प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाने उलटी केल्याने प्रियकराने त्याला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. महेश कुंभार (रा. पंचवटी, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वेदांश वीरभद्र काळे (वय ४ रा. बिबवेवाडी ) असे मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. चार वर्षांच्या मुलगा वेदांश खाटेवरुन खाली पडल्याने बेशुद्ध पडल्याचा बनाव करून त्याची आई पल्लवीने त्याला मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात दाखल केले होते. २ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात वेदांशचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केेले होते. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, उपनिरीक्षक शशांक जाधव, विजय लाड, अंकुश केंगले, नितीन धोत्रे, आदिती बहिरट यांनी वेदाशंची आई पल्लवीकडे चौकशी केली. चौकशीत पल्लवी तीन महिन्यांपासून बिबवेवाडीत राहत होती. हे ही वाचा.पुणे : गणेशोत्सवात जड वाहनांना मध्यभाागात बंदी तिचे नाशिकमधील महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तपासात उघडकीस आले. पल्लवी मुलाला घेऊन आरोपी महेशच्या घरी गेली होती. १ सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने उलटी केल्याने तो चिडला. त्याला झाडूने मारहाण केली. वेदांश बेशुद्ध पडल्यानंतर त्याला नाशिकमधील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दोघांनी त्याला मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आराेपी महेशला अटक केली असून, संबंधित गुन्हा नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तपासासाठी सोपविण्यात आला. पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास केला.