पुण्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण MIDC च्या मेदनकरवाडीत एका चार वर्षीय मुलीच अपहरण झाल्याचा गुन्हा चाकण पोलिसात दाखल होता. त्यानंतर काही तासातच जवळच्या शेतात कुत्र्यांनी लचके घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेमुळं पिंपरी-चिंचवड पोलीस देखील चक्रावले आहेत. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुलीच्या छातीवर बोथट आघात झाल्याचं पुढं आलं असून खुनाचा (३०२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणाला काही माहिती असल्यास पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, माहिती देणाऱ्या व्यक्तीच नाव गुप्त ठेवण्यात येईल अस पत्रकच चाकण पोलिसांनी काढलं आहे. मुलीचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा संशय पोलिसांना आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

मुलीसोबत काही अघटित घडलं आहे का? –

सविस्तर माहिती अशी की, बुधवार (१०ऑगस्ट ) रोजी दुपारी चार वर्षीय मुलगी घरापासून बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी दिवसभर तिचा शोध घेतला, अखेर रात्री चाकण पोलिसात येऊन अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलीस मुलीचा शोध घेतच होते, तेवढ्यात दुसऱ्या दिवशी (११ ऑगस्ट ) रोजी मुलगी राहात असलेल्या घराच्या काही अंतरावर मृत अवस्थेत आढळली. मुलीचे कुत्र्यांनी लचके तोडल्याच पोलीस सांगतात. मृतदेहाचा कंबरे खालील भाग नाही, त्यामुळं पोलीसांच्या शोधत अनेक अडथळे येतायत. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात छातीवर बोथट आघात झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी चाकण पोलीसांनी कलमवाढ करून (३०२) हे कलम वाढवल आहे. मुलीसोबत काही अघटित घडलं आहे का? याबाबत शंका आहेत. 

या गुन्ह्याचा छडा लावणं पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठं आव्हान –

मृत्यू झालेल्या मुलीचं कुटुंब चार दिवसांपूर्वी मेदनकर वाडीत राहण्यास आलं आहे. त्यात अशी घटना घडल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाकण पोलिसांनी या घटनेबाबत कोणाला काही माहिती असल्यास पिंपरी-चिंचवड, चाकण पोलिसांना माहिती देण्यात यावी अस आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे. घटनेबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीच नाव गुप्त ठेवण्यात येईल अस देखील नमूद करण्यात आलं आहे. या गुन्ह्याचा छडा लावणं पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. मावळात सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी तेजस दळवीला अटक देखील करण्यात आली आहे. अवघ्या महाराष्ट्रातून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून मागणी होत आहे. त्यात चाकण मधील घटना धक्कादायक मानली जात आहे.