चार वर्षांच्या एका चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही मुलगी सात कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचली आहे कारण तिचं किंचाळणं ऐकून लोक आले आणि कुत्र्यांना हाकलून लावलं. मात्र ही मुलगी सात कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे.

व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?

जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यामध्ये चार वर्षांची मुलगी इमारतीच्या गेटमधून बाहेर येते आणि मैदानाच्या दिशेने जाते. तेवढ्यात तिला कुत्रे दिसतात. त्यांना पाहून ती पळ काढते. पण दोन कुत्रे तिचे कपडे धरतात आणि तिला खाली पाडतात. त्यानंतर आणखी पाच कुत्रे येतात आणि तिला चावे घेऊ लागतात. ही मुलगी ओरडत असते. मात्र काहीही उपयोग होत नाही. त्यानंतर मुलीचा आवाज ऐकून चार ते पाच शेजारी धावत येतात ते कुत्र्यांना हाकलून लावतात. पण कुत्र्यांच्या हल्ल्यात ही चार वर्षांची मुलगी जखमी झालेली असते त्यामुळे ती तशीच पडून असते. एक तरुण तिला उचलून घेतो आणि रुग्णालयात घेऊन जातो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

चार वर्षांच्या मुलीला गंभीर जखमा

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ही मुलगी जखमी झाली आहे. तिला अनेक जखमा झाल्या आहेत. कुत्र्यांनी तिचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे दोन ते तीन मिनिटं कुत्रे तिचे चावे घेत होते. ही मुलगी ओरडत होती. त्यानंतर शेजारी आले आणि त्यांनी या मुलीला वाचवलं त्यामुळे ही मुलगी वाचल्याचं दिसून येतं आहे. दुसरीकडे या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणत प्रशासनाकडे धाव घेतली आहे. याआधीही या ठिकाणी अशा घटना घडल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे. या घटनेनंतर लहान मुलांच्या खेळण्याच्या जागेत भटके कुत्रे वावरत असतील तर त्यांची सुरक्षा कशी करायची हा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण ज्या चार वर्षांच्या मुलीवर कुत्र्यांनी हल्ला केला त्यावेळी ती मुलगी खेळायलाच बाहेर पडली होती. तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे ती प्रचंड घाबरुनही गेली आहे.