वस्तू आणि सेवा कर विभागाची कारवाई

बनावट खरेदी देयकांच्या आधारे सात कोटी ३८ लाख रुपयांचा कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यास वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने अटक केली.प्रवीण भबूतमल गुंदेचा असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. गुंदेचा यांची जिरावाला मेटल्स ही कंपनी आहे. त्या माध्यमातून ते खाद्यतेलाचा व्यापार करतात. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वार्षिक जमाखर्चामध्ये अनियमितता आढळली. त्याबाबत तपास करण्यात आला असता गुंदेचा यांनी ४१ कोटी रुपयांची बनावट खरेदी देयके सादर केल्याचे तसेच त्यावर कर परतावा हमी घेऊन (टॅक्स क्रेडिट) शासनाचा ७ कोटी ३८ लाख रुपयांचा महसूल बुडविला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

सहायक आयुक्त सतीश पाटील, सचिन सांगळे, दत्तात्रय तेलंग आणि पथकाने ही कारवाई केली. वस्तू आणि सेवा कर विभागाकडून गैरप्रकार करणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. त्यांच्यावर आगामी काळात कडक कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त राज्य कर आयुक्त धनंजय आखाडे यांनी सांगितले.