पुणे : एका भोंदूने उच्चशिक्षित महिलेवर अत्याचार करून महिलेला मूत्र प्यायला लावल्याचे उघडकीस आले. भोंदूबाबाने शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला पतीपासून विभक्त होण्यास भाग पाडले. तसेच, तरुणीची मालमत्ता स्वत:च्या नावावर करून घेतली. अखेर अत्याचारामुळे खचलेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. लैंगिक अत्याचार, कट रचणे, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २००१ ते २०२६ या कालावधीत हे प्रकरण घडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची हरियाणाची आहे. तिचे वडील डाॅक्टर असून, तीही उच्चशिक्षित आहे. पुण्यातील एका खासगी कंपनीत ती नोकरी करते. तिचे वडील आता अटकेत असलेल्या एकाच्या खराडीतील आश्रमात गेले होते. त्या वेळी मुख्य आरोपीशी त्यांचा परिचय झाला. मुख्य आरोपीचा आश्रम हरियाणातील पंचकुला येथे आहे.
आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून मुख्य आरोपीने महिला आणि तिच्या कुटुंबीयांना जाळ्यात ओढले. नंतर हरियाणातील कुरुक्षेत्र येथे एक अत्याधुनिक गुरुकुल सुरू करण्याची योजना मांडली. त्यासाठी महिलेचे आई-वडील तेथे जाऊन राहू लागले. आश्रमही सुरू करण्यात आला. त्यातच तरुणीच्या भावाला अपघात झाला. तो इमारतीवरून पडूनही आरोपीच्या दैवी शक्तीमुळे वाचला, अशी बतावणी महिला व कुटुंबीयांना करण्यात आली. दरम्यान, महिलाही कुटुंबीयांबरोबर मुख्य आरोपीच्या आश्रमात वास्तव्य करू लागली. त्या वेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. परीक्षा पाहायची आहे, असे सांगून मारहाणही केली. तसेच, विजेचे धक्के दिले. ‘तुमची मुलगी वाईट मार्गावर चालली आहे. तिला सुधारावे लागेल,’ असे आरोपीने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतरही आरोपी तिला त्रास देत राहिला. त्याच्या त्रासामुळे महिला २०१० मध्ये कुटुंबीयांसह पुण्यात स्थलांतरित झाली. त्यानंतरही आरोपीने महिलेला त्रास देणे सुरूच ठेवले. तिच्या तयार केलेल्या चित्रफितीवरून तो तिला छळू, धमकावू लागला. ते असह्य झाल्यावर महिलेने पोलिसांत तक्रार दिली.
भोंदूच्या आश्रमावर छापा
पोलिसांनी भोंदूच्या आश्रमावर छापा टाकून तेथून १२ लॅपटाॅप, एक टॅब, ११ मोबाइल संच, १९ हार्डडिस्क, साडेसहा लाखांची राेकड, डीव्हीडी, २३ पेनड्राइव्ह, दहा काडतुसे, १५ लाखांचे दागिने जप्त केले. भोंदूने तरुणीला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवले होते. तिच्या हालचालींवर तो नजर ठेवायचा. खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तरुणी तेथून पळाली होती. महिलेने विवाह केल्यानंतर भोंदूने तिला धमकावून घटस्फोट घेण्यास भाग पाडले होते.
पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींमध्ये महिलाही आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. – तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
