पुणे : कृषी उद्योगात गुंतवणुकीच्या आमिषाने २४ जणांची १३ कोटी ८२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्हर्टिकल फार्मिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या हळद उत्पादन प्रकल्पात गुंतवणूक केल्यास परतावा देण्याचे आमिष आरोपींनी गुंतवणुकदारांना दाखविल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी प्रशांत झाडे (रा. अंबरनाथ, जि. ठाणे), रोहन मताले, संदेश गणपत खामकर (रा. नाशिक), जयंत रामचंद्र बांदेकर (रा. मुंबई), कमलेश महादेवराव ओझे यांच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेही वाचा - वाहनांच्या वेगावर लवकरच नियंत्रण, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘एचटीएमएस’अंतर्गत कामे अंतिम टप्प्यात तक्रारदार मूळचे अकोला येथील शेतकरी आहेत. समाजमाध्यमातील एका संदेशातून त्यांना ए. एस. ॲग्री अँड ॲक्वा या कंपनीची माहिती मिळाली होती. या कंपनीच्या संकेतस्थळावर गुंतवणूक योजनेची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदाराने आराेपी रोहन मताले याच्याशी संपर्क साधला. त्यांनी गुंतवणूक योजनेची माहिती घेतली. आरोपींनी तक्रारदाराला बाणेर येथील कार्यालयात बोलावले. मताले आणि बांदेकर यांनी त्यांना पुन्हा योजनेची माहिती दिली. आम्ही व्हर्टिकल फार्मिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हळदीचे उत्पादन घेणार आहोत. आमची कंपनी कृषीमाल लागवडीत पहिल्या क्रमांकावर असल्याची बतावणी आरोपींनी केली होती. शंभर एकरात निघणारे उत्पादन आम्ही एका एकरात घेतो, असे आरोपींनी त्यांना सांगितले होते. हेही वाचा - पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा, अजित पवारांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता या योजनेत गुंतवणुकदाराने स्वत:ची जमीन कंपनीला द्यायची आहे. प्रकल्प उभारणीसाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर गुंतवणुकीवर कंपनीकडून चांगला परतावा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. तक्रारदाराने आरोपींना एक कोटी रुपये दिले हाेते. आरोपींनी प्रकल्प उभारला नाही. या बाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी अशा पद्धतीने २३ जणांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.