scorecardresearch

पुणे: संलग्न महाविद्यालयांकडून विद्यापीठाची फसवणूक?

विद्यापीठ मान्यता नसलेल्या अध्यापकांच्या नावाची महाविद्यालयांकडून नोंद

पुणे: संलग्न महाविद्यालयांकडून विद्यापीठाची फसवणूक?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ फोटो सौजन्य – लोकसत्ता टीम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित काही महाविद्यालयांनी विद्यापीठ मान्यता नसलेल्या अध्यापकांच्या नावाची नोंद विद्यापीठाच्या संकेतस्थळावर केल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब फसवणूक आणि दिशाभूल करणारी असून, विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, अशी माहिती विद्यापीठाने दिली. तसेच विद्यापीठ मान्यता अध्यापकांचीच माहिती भरावी, अन्यथा संबंधितांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पुणे: नवले पूल परिसरातील अतिक्रमणे सात दिवसांत न काढल्यास कारवाई

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ. एम. व्ही. रासवे यांनी या बाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमध्ये निश्चित केलेल्या पद्धतीद्वारे किंवा निवड समितीद्वारे नेमणूक केलेल्या प्राचार्य, संचालक, अध्यापकांना विद्यापीठ मान्यता मिळाल्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील त्यांच्या ऑनलाइन खात्यामध्ये मान्यतेबाबतची माहिती अचूक भरणे, अद्ययावत करणे आवश्यक आहे. मात्र काही महाविद्यालयांनी अद्यापही ही माहिती अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे वेळेवर संपर्क होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही महाविद्यालयांनी विद्यापीठ मान्यता नसलेल्या अध्यापकांच्या नावाचाही समावेश केला आहे. हे कृत्य फसवणूक आणि दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत चुकीची माहिती पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. रासवे यांनी नमूद केले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 10:53 IST

संबंधित बातम्या