लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या निवृत्त बँक अधिकाऱ्याला मदत करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत निवृत्त बँक अधिकाऱ्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ८१ वर्षीय बँक अधिकारी सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. ४ सप्टेंबर रोजी कामानिमित्त शास्त्री रस्त्यावर आले होते. शास्त्री रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएममधून ते पैसे काढत होते. त्यावेळी एटीएममधून पैसे निघाले नाही. एटीएममध्ये त्यांच्या मागोमाग एक चोरटा शिरला होता. पैसे न निघाल्याने चोरट्याने त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. चोरट्याने त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर चोरट्याने एटीएममधून पैसे काढण्याचा बहाणा केला. चोरट्याने त्याच्याकडील कार्ड त्यांना दिले.

आणखी वाचा-पुणे: भरधाव मोटारीच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

त्यांच्याकडील कार्ड चोरून चोरटा पसार झाला. काही वेळानंतर चोरट्याने कार्ड बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले. कार्ड बंद करण्यासाठी ते बँकेत निघाले. चोरट्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या कार्डचा गैरवापर करून खात्यातून ५० हजार रुपये चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.