पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यात जीआरई, टोफेल, आयईएलटीएस यांसारखे भाषा अभ्यासक्रम मोफत शिकवण्यात येणार आहेत. या बाबतची अधिक माहिती विद्यार्थ्यांना http://www.unipune.ac.in/dept/International Centre वर उपलब्ध होईल.

‘सिलेक्ट युवर युनिव्हर्सिटी ऑनलाइन डिजिटल एज्युकेशन फाउंडेशन’  या दिल्ली येथील संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, गिरीश भवाळकर, फाउंडेशनचे संचालक संदीप सिंग या वेळी उपस्थित होते. निवडक विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे डॉ. खरे यांनी सांगितले.

अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा असते. पण बऱ्याचदा त्यांना योग्य माहिती, मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांना अडचणी येतात. या कराराच्या माध्यमातून जीआरई, टोफेल आदी परीक्षांबाबत मार्गदर्शन केले जाईल. निवडक विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे डॉ. खरे यांनी सांगितले.