पुणे : राज्यात जपानी मेंदूज्वर (जपानी एन्सेफलायटिस) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रायगड, परभणी, पुणे या तीन जिल्ह्यांत आणि पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे या चार महापालिकांमध्ये ही लसीकरण मोहीम १ मार्चपासून सुरू झाली आहे. पुणे महापालिकेने या मोहिमेत आतापर्यंत १ लाखांहून अधिक मुलांना लस दिली आहे.
मेंदूज्वर लसीकरण मोहिमेंतर्गत पुणे शहरातील १ ते १५ वर्षे वयोगटातील एकूण १० लाख ४३ हजार ४२० मुला-मुलींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अंमलबजावणी व अहवाल सादरीकरण कक्ष आहेत. सर्व परिमंडळ व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील समन्वयक अधिकारी म्हणून काम करीत आहेत. पुणे महापालिकेने आतापर्यंत या मोहिमेत एकूण १ लाख ४ हजार ५४० मुलांना ही लस देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत एकूण ६ हजार ६९२ लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. मेंदूज्वर लसीकरण सत्रे ही पुणे शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, समुदाय केंद्रे (अंगणवाडी) या ठिकाणी आयोजित केली जात आहेत. या लसीकरण मोहिमेत लस देण्यासाठी ५२२ कर्मचारी असून, त्यांना ३६५ आशा कार्यकर्त्या, १ हजार ९२ अंगणवाडीसेविका आणि ८४८ शिक्षक व शिक्षिका मदत करीत आहेत. शहरातील वैद्यकीय महाविद्यालये आणि परिचारिका महाविद्यालयांचे लसीकरणासाठी सहकार्य घेतले जात आहे. याचबरोबर शहरातील खासगी डॉक्टरांनीही लहान मुलांच्या लसीकरणास प्रोत्साहन द्यावे, यासाठी आवाहनही करण्यात आले आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले.
मेंदूज्वर लसीकरण मोहीम
वयोगट – १ ते १५ वर्षे वयोगटातील मुले
उद्दिष्ट – १० लाख ४३ हजार ४२०
साध्य – १ लाख ४ हजार ५४०
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळून येतात. त्या ठिकाणी सरकारी लसीकरणात यावरील लसीचा समावेश आहे. स्थलांतराचे प्रमाण वाढल्याने पुण्यातही या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे राज्य सरकारने पुण्यासह काही जिल्ह्यांत ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या आजाराचे रुग्ण आढळून येत असलेल्या भागात मुलांना ही प्रतिबंधात्मक लस देणे आवश्यक आहे.- डॉ. आरती किणीकर, प्रमुख, बालरोगचिकित्सा विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय