हे कसले अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

समाज, साहित्य आणि संस्कृतीला करोना झाला आहे. त्यावरच्या लसीकरणाला म्हणूजे मूल्यांना आपण विसरत चाललो आहोत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते डॉ. न. म. जोशी आणि डॉ. अनिल अवचट यांना मसाप जीवनगौरव पुरस्कार, तर डॉ. सुनीलकुमार लवटे आणि मोहन रेडगावकर यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार गुरुवारी प्रदान करण्यात आला. राजीव बर्वे, डॉ. शिवाजीराव कदम, प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होत्या.

डॉ. न. म. जोशी यांचा सवाल    

पुणे : समाज, साहित्य आणि संस्कृतीला करोना झाला आहे. त्यावरच्या लसीकरणाला म्हणूजे मूल्यांना आपण विसरत चाललो आहोत. आजचे साहित्यिक समाजाला मार्गदर्शन करण्याऐवजी संभ्रमात टाकतात. दररोज प्रत्येकजण वाट्टेल तसे बोलत आहे. हे कसले अभिव्यक्ती स्वातंत्र्य?, असा परखड सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी गुरुवारी उपस्थित केला.

 महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी आणि ज्येष्ठ लेखक-सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना ‘मसाप जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्या वेळी जोशी बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. सुनीलकुमार लवटे आणि मोहन रेडगावकर यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. तसेच ग्रंथकार आणि ग्रंथ पारितोषिकांचे वितरण या वेळी झाले. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या.

जोशी म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा आहे त्या संस्था आणि यंत्रणांच्या माध्यमातून मराठीचे भले केले पाहिजे. पुढच्या पिढीला मराठी भाषा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे.

अवचट म्हणाले,की साहित्याला बाजूला ठेवून लोक माझ्या कलेविषयी बोलतात. साहित्य परिषदेने साहित्यासाठी गौरव ऑकेला हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. हल्लीचे लेखक भरमसाठ ग्रंथसंपदा निर्माण करतात. त्यापेक्षा विचार करायला लावणारे तितकेच रसाळ साहित्य निर्मिले पाहिजे. निसर्ग जतनाची जबाबदारी साहित्यिकांवर आहे. चांगले लेखक उत्तम नवनिर्मिती करून निसर्गाचे बळ वाढवतील, यावर माझा विश्वास आहे.

..तर देश पराभूत होईल

कोणी कोणाचे ऐकत नाही आणि कोणी इतरांना समजून सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, अशा अराजक स्थितीत देश पोहोचला आहे. देशात जाती आणि वर्ग युद्ध सुरू झाले आहे. साहित्यिक आणि कलावंत भीती व संभ्रमात आहेत. देशात वाट्टेल ते बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. पण सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, अशी टीका डॉ. रावसाहेब कसबे यांनी केली. भांडवलशाही अर्थव्यवस्थेने निरूपयोगी केलेला सामान्य माणूस समाज आणि देशापासून तुटला आहे. साहित्यिक जाणिवा विकसित करतो; पण आजचे साहित्यिक आपल्यातील लेखक मेला आहे, असे जाहीर करतात. ही अराजकाची सुरुवात आहे. भयामध्ये वावरणारा सामान्य माणूस आणि समाज आतला आवाज गमावून बसला आहे. विचारवंत स्पष्ट बोलत नाहीत. साहित्यिक ताठ मानाने उभे नाहीत. लेखक आणि कलावंतांची मुस्कटदाबी होत राहिली तर हा देश पराभूत व्हायला वेळ लागणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Freedom expression question answer ysh

ताज्या बातम्या