पुणे : ‘भारतीय वैचारिक परंपरेचा धागा सरकारी पातळीवर पाठिंबा असेपर्यंत मजबूत राहिलेला आहे. ज्या वेळी सरकारने भूमिका बदलली, त्या वेळी वैचारिक स्वातंत्र्यांचा संकोच होतो की काय, अशी स्थिती येताना दिसते. भूमिका घ्यावी, की न घ्यावी, याबाबत विद्वानांचा गोंधळ आणि सरकारची त्याबाबतची संदिग्धता इथे भारतीय बौद्धिक परंपरा ठेचकाळताना दिसते,’ असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी शनिवारी केले.
डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति संशोधन केंद्रातर्फे आयोजित ‘प्रबोधनाचा इतिहास आणि वर्तमान वास्तव’ या विषयावर कुबेर यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते.
‘युरोपातील प्रबोधनपर्वात वैचारिक परंपरेपुढे राजसत्तेला माघार घ्यावी लागली. ही ता्त्विवक परंपरा किती मोठी आहे, याचेही कौतुक केले गेले. त्यातून तो धागा मजबूत होऊन युरोपात तो आजतागायत टिकून आहे. आपल्याकडे इंग्रजांनी दमनशाही केलीच, ते नाकारता येणारच नाही. पण, त्या काळात वैचारिक परंपरेलाही गती मिळाली. इंग्रजांनंतरचे जे आंग्लविद्याविभूषित सरकार होते, त्यांनी हीच परंपरा काही प्रमाणात कायम ठेवली. वैचारिक चळवळीला सरकारचा पाठिंबा होता, तोपर्यंत हा धागा टिकून राहिला. सरकारने भूमिका बदलल्यानंतर तो तुटल्याचे दिसते,’ असे कुबेर म्हणाले
‘सध्या परिस्थिती अशी आहे, की कोण काय बोलतो, यावर त्याची राजकीय भूमिका ठरते. त्याची राजकीय भूमिका ठरली, की तो काय बोलतो हे कळते आणि ते एकदा ठरले, की तो काय बोलतो, किंवा बोलत नाही किंवा काय लिहितो किंवा लिहित नाही, हे बघायचीच वेळ येत नाही. या टप्प्यावर आपली बौद्धिक परंपरा येऊन थांबली आहे. अशा अवस्थेत माणसे स्वनियंत्रणाकडे जातात. सरकारने लादलेल्या ‘सेन्सॉरशिप’पेक्षा स्वयनियंत्रण सर्वांत घातक असते.’
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, भास्कर तर्खडकर, गोपाळ हरि देशमुख, महात्मा फुले, मुक्ता साळवे, पंडिता रमाबाई, न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, महादेव नामजोशी यांच्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतच्या प्रबोधनाच्या परंपरेचा वेध घेताना करकरीत बुद्धिवाद महाराष्ट्रात जोपासला गेल्याचे कुबेर यांनी नमूद केले.
‘बौद्धिक विश्वाला व्यवस्थेने आधार देण्याची आणि बुद्धिवंतांचा गौरव करण्याची परंपरा खंडित झाल्यानंतर काय, हा प्रश्न आपल्या देशासमोर आहे. गॅलिलिओ, सॉक्रेटिस यांच्यासारख्यांचे नसणे, यामुळे बौद्धिक परंपरा अस्थिर झाल्याची भावना निर्माण होते, किंबहुना ती अस्थिर झालेली आहे,’ असे गिरीश कुबेर यांनी नमूद केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री, लेखिका डॉ. अरुणा ढेरे, तसेच अन्य मान्यवर व्याख्यानाला उपस्थित होते. डॉ. वर्षा गजेंद्रगडकर यांनी संशोधन केंद्राच्या कामकाजाची आणि सुरू असलेल्या प्रकल्पांविषयी माहिती दिली.
‘वैचारिकता वेगवेगळ्या कप्प्यांत विभागली’ ‘आणीबाणीची आणि आताची तुलना करताना, आणीबाणीच्या वेळी एकाला कुणाला तरी खलनायक ठरवले गेले होते. त्या विरोधात एकत्र येण्याची भावना निर्माण केली गेली होती, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आताच्या काळात वैचारिकता वेगवेगळ्या कप्प्यांत विभागली गेली असल्याने तिला अराजकीयपणे पाहण्याची क्षमताच आपण गमावून बसलेलो आहोत,’ असे कुबेर यांनी स्पष्ट केले.

