प्राची आमले

स्वयंप्रेरणेतून सामाजिक बदल या तत्त्वावर विश्वास ठेवत आपत्कालीन परिस्थितीत जात, धर्म, प्रांत या सर्व सीमा ओलांडत स्वयंसेवकांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करणाऱ्या ‘मैत्री’ या संस्थेविषयी..

काळ, वेळ आणि वेगाच्या सगळ्या गणितांवर मात करत त्यापलीकडे जाऊन पोचलेली एक गोष्ट म्हणजे समाज माध्यमं. समाज माध्यमं अनेकदा चर्चेत राहातात ती त्याच्या वापरातून होत असलेल्या नकारात्मक गोष्टींसाठीच. पण याच माध्यमांचा वापर करत अनेक आदर्श समाजासमोर उभे राहिलेले आपण पाहिले आहेत. समाज माध्यमांचा वापर करत केवळ जिल्हा किंवा राज्यापुरते मर्यादित न राहता देशभर स्वयंसेवकांच्या माध्यमातून मदतकार्य पोहोचविण्याचे जाळं ‘मैत्री’ या संस्थेने विणले आहे.

स्वयंप्रेरणेतून सामाजिक बदल या तत्त्वावर विश्वास ठेवत स्वयंसेवकांच्या माध्यमातून सामाजिक काम करण्यासाठी १९९७ मध्ये ‘मैत्री’ संस्थेची स्थापना झाली. सध्या ‘मैत्री’चे पन्नासहून अधिक नियमित स्वयंसेवक असून विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणारे साडेतीन हजाराहून अधिक स्वयंसेवक देशात व देशाबाहेर कार्यरत आहेत.

पुराच्या पाण्यामुळे विस्कळीत झालेली जीवनशैली, गाळाने भरलेल्या विहिरी, कुजलेली झाडे, पडलेली घरे अशी काहीशी परिस्थिती पूर ओसरून गेल्यानंतरही केरळमधील कुळ्ळूर ( जि. त्रिचूर) या गावातील पूरग्रस्तांची आहे. या पूरग्रस्तांसाठी संस्थेने ‘चला, परत घराकडे’ अशी हाक देऊन ७४० कुटुंबांना त्यांच्या घरांमध्ये  स्थिरस्थावर होण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या विषयी संस्थेच्या स्वयंसेवक विनीता ताटके म्हणाल्या,की केरळमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांचा चमू तातडीने तेथे रवाना झाला. नागरिकांना स्थिरस्थावर करणे, पुराच्या पाण्यात वाहून गेलेली परसबाग तयार करणे, बी-बियाणांचा पुरवठा यासारखी कामे स्वयंसेवकांकडून केली जात आहेत. या उपक्रमासाठी १४ लाख रुपयांची मदत आतापर्यंत आली आहे. ‘मैत्री’ संस्थेतर्फे मेळघाट मित्र, नैसर्गिक आपत्तींमध्ये मैत्री, धडक मोहीम, मैत्री शिक्षण, विज्ञान शाळा यांसारखे अनेक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी, व्यावसायिक , नोकरदार, डॉक्टर, शिक्षक, गृहिणी अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती यामध्ये स्वयंसेवक म्हणून काम पाहतात. संवाद साधणे, माहितीची देवाणघेवाण करणे यासाठी समाज माध्यमांचा उपयोग होतो. तसेच संस्थेचे विविध उपक्रमांचे स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असून यावर येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती, मदतीसाठी आवाहन व चर्चा होत असते. आतापर्यंत गुजरातमधील भूकंप,तमिळनाडूमधील त्सुनामी, कोकणातील अतिवृष्टी, लेहमधील ढगफुटी, उत्तरांचलमधील जलप्रलय, नेपाळमधील भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात तेथील आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी मैत्रीने मदत केली आहे.

संस्थेच्या नवीन उपक्रमांविषयी ताटके म्हणाल्या,की मेळघाटमधील आश्रमशाळेतील मुलांच्या मनातील विज्ञानाची भीती घालवण्यासाठी विज्ञान शाळा हा उपक्रम दर महिन्याला राबविण्यात येतो. याअंतर्गत आश्रमशाळेतील सहावीच्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक विज्ञानविषयक माहिती देण्याचे काम करतात. मैत्रीचे फेसबुक पेज व संकेतस्थळ असून या माध्यमातून इच्छुक व्यक्तींना स्वयंसेवक होता येते. तसेच संकेतस्थळाचा वापर करून पूरग्रस्तांसाठी मदत करता येते. कमला नेहरू उद्यानामध्ये दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मैत्री गटातील स्वयंसेवक भेटतात. एकमेकांच्या कल्पना,विविध विषयांवर चर्चा, चालू उपक्रमांचा आढावा या बैठकीत घेतला जातो.

संकेतस्थळ – http://www.maitripune.net