मोरोक्को. उत्तर आफ्रिकेतल्या वाळवंटातील लहानसा देश. मध्य पूर्वेतील खेचाखेचीत इथला समाज सोलपटून निघाला. वर्चस्वाच्या महत्त्वाकांक्षेत आख्खा देशच कसा वाळवंट होतो, याचे मोरोक्को हे जिवंत उदाहरण. सध्याच्या तरुणाईला जगातील कानाकोपऱ्यात उमटणाऱ्या पडसादांचे आकर्षण आहे. मोरोक्कोच्या वाळवंटात चौकटी मोडू पाहणाऱ्या चार-पाच लोकांचा जथ्था नि युद्धजन्य भवतालाच्या संवेदना त्यांना आपल्याशा वाटतात. अस्वस्थ वर्तमानात माणसांच्या कोलाहलातून काही तरी नवे जन्मू पाहते आहे, थोडा वेळ लागेल, पण ही नवी वैश्विकता आकार घेते आहे. ‘पिफ’च्या दुसऱ्या दिवशी याच वैश्विकतेचा प्रत्यय आला.

‘ट्रान्स’मध्ये घेऊन जाणारे आगळे-वेगळे संगीत, मेंदूच्या शीरा ताणणारे प्रसंग, ‘ड्रग्ज’बरोबर ‘डान्स’च्या माध्यमातून वेदनेला मागे टाकू पाहणारा नि रहस्य म्हणून आकर्षण असलेल्या ‘रेव्ह’ लोकांचा जथ्था (आपल्याकडच्या बदनाम झालेल्या रेव्ह पार्ट्या नाही, तर ड्रग्स पलीकडे शांतता, स्वातंत्र्य, मुक्ततेसाठी धडपडणाऱ्या लोकांचा समूह) आणि युद्धाच्या धामधुमीत वाळवंटात हरवलेल्या मुलीला शोधायला म्हणून लहान मुलाबरोबर निघालेल्या बापाची कहाणी, अशा सगळ्याच पातळ्यांवर जागतिक ठरलेला ओलिव्हर लाक्से दिग्दर्शित ‘सिरत’ सिनेमा पाहण्यासाठी ‘पिफ’च्या दुसऱ्या दिवशी रांगा लागल्या. तिसऱ्या महायुद्धामुळे जग संपेल, या भीतीतही ‘वी डोण्ट डिस्टर्ब एनी वन, वी आर जस्ट डान्सिंग,’ असे ठासून सांगणाऱ्या, अंगावर एकापेक्षा जास्त टॅटू नि चौकटी मोडून मुक्ततेसाठी धडपडणाऱ्या ‘कूल’ लोकांची कहाणी ‘जेन-झीं’च्या आकर्षणाचा विषय ठरली. सत्तेच्या कोलाहलात बेधुंद होऊन जगू पाहणाऱ्या माणसांची, युद्धात सोलपटलेल्या एका देशाची कहाणी नि वाळवंटाचे सौंदर्य टिपणाऱ्या प्रत्येक फ्रेमला सिनेप्रेमींनी मोकळेपणाने दाद दिली.

कलेचा माणूसकेंद्री व्यवहार प्रांत-भाषांच्या चौकटी मोडून प्रकृतीशी तादात्म्य साधतो. आपल्याकडच्या पंचतंत्रातील गोष्टी असोत, की मध्य-पूर्वेतील अरेबियन नाइट्स. काही कहाण्या एकाच प्रदेशाच्या नि एकाच काळाच्याही राहत नाहीत. निसर्गाने दिलेले धडे सार्वकालिक असतात. ते विसरले, की नव्या उलथापालथींना सुरुवात होते. नवे ताण-तणाव आकाराला येतात. मात्र, अशाही वेळी ‘रिबिल्डिंग’ म्हणजे नव्याने उभारणीचा निसर्गाचा धडाच कामी येतो. मॅक्स-वॉकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रिबिल्डिंग’ सिनेमानेही पुण्यातील जाणत्या प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सुरुवातीला संथ वाटणारा पट, कहाणी आणि संवादाच्या जोरावर शेवटापर्यंत खिळवून ठेवतो. त्यात ‘इट्स नॉट द मॅजिक बूट, यू हॅव द मॅजिक’ अशा सुभाषितांच्या दर्जाला गेलेल्या संवादाने सिनेमातल्या नायकाप्रमाणे काहीसे गमावून, काहीसे टिकवून, कुठे जायचे या गोंधळात असलेल्या तरुणाईला आशेचा दिलासा देऊन जातो.

दरम्यान, जागतिक चित्रपटांच्या कामगिरीने प्रेरित झालेल्या नव्या दमाच्या दिग्दर्शक-निर्मात्यांनी सरकार सिनेमांसाठी काय करते, हे जाणून घ्यायलाही हजेरी लावली. ‘फिल्म इकोसिस्टीम’च्या कार्यशाळेला गर्दी नसली, तरी चित्रपट आणि सांस्कृतिक रंगभूमीचे प्रयत्न जाणत्यांनी वहीत टिपून घेतले. ‘पिफ’च्या दुसऱ्या दिवसातून उमटलेल्या प्रतिसादांनी मराठीतही जागतिक चित्रपटांची भर पडण्याची शक्यता नक्कीच दुणावते.

आजचे चित्रपट

  • द नेचर ऑफ इनव्हिजिबल थिंग : सकाळी १०.१५ (पीव्हीआर)
  • वन्स अपॉन अ टाइम इन गाझा : दुपारी १२.३० (पीव्हीआर)
  • निनो : दुपारी ३.०० (ई-स्केअर)
  • व्हिक्टोरिया : दुपारी २.३० (एनएफआय)
  • ॲडम्स सेक : सायंकाळी ४.३० (पीव्हीआर)
  • तिघी : सायंकाळी ५.३० (पीव्हीआर)
  • कार्यशाळा : युरोपीय सिनेमासमोर अमेरिकी सिनेमाचे आव्हान : दुपारी ३.३० (पीव्हीआर)