पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जून-जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (१५ मे) सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २४ मेपर्यंत, तर विलंब शुल्कासह २९ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

राज्य मंडळाने पुरवणी परीक्षेसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी यापूर्वीच सुरू केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही नोंदणी सुरू करण्यात येत आहे. त्यानुसार पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधारण्यास इच्छुक विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विद्यार्थी यांना अर्ज भरता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल. श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६, जून-जुलै २०२६ अशा तीन लगतच्या संधी उपलब्ध राहतील. नियमित आणि विलंब शुल्काने अर्ज भरण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप आज

राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना १६ मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्याचे निर्देश राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे दिले आहेत.