पिंपरी : पाकिस्तानच्या सीमेवर शत्रूशी लढताना माझ्या डोक्यावर, पाठीवर नऊ गोळ्या लागल्या. दोन वर्षे कोमात होतो. मृत्यूशी झुंज जिंकली, पण वयाच्या २१ व्या वर्षी आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. त्यावर मात करत हार न मानता देशासाठी पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. या संघर्षाची कहाणी ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आल्याने विलक्षण आनंद झाल्याची भावना मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केली. जलतरणात सुवर्णपदक मिळाल्यानंतर भारताचा तिरंगा उंचावर फडकताना पाहून सर्वोच्च आनंद झाला. हाच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

‘चंदू चॅम्पियन’ हा पॅराऑलिम्पिकविजेते मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट आहे. सैन्य अधिकारी असलेल्या पेटकर यांना १९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक लढाईत अपंगत्व आले होते. त्यांनी या अपंगत्वावर मात करत पॅरालिम्पिकमध्ये तीन स्पर्धा प्रकारांमध्ये विजेतेपद मिळवले. त्यात जलतरण, भालाफेक, गोळाफेक यांचा समावेश आहे. त्यांचा हा सगळा प्रवास चित्रपटात आहे. थेरगाव येथे वास्तव्यास असलेल्या पेटकर यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

हेही वाचा…धक्कादायक : मराठा आरक्षणासाठी पुण्यातील तरुणाची आत्महत्या

सांगली जिल्ह्यात १ नोव्हेंबर १९४४ रोजी जन्मलेल्या पेटकर यांनी १९७२ च्या उन्हाळी पॅराऑलिम्पिकमध्ये जर्मनीतील हायडलबर्ग येथे झालेल्या ५० मीटर जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या यशापूर्वी पेटकर यांनी भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनीअर्स (ईएमई) कारागीर रँकचे सुभेदार म्हणून काम केले. त्यांचे योगदान पाहता २०१८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले.

पेटकर यांनी पुण्यात आर्मी बॉयज येथून शिक्षण घेतले. सुरुवातीला सैन्यात हॉकी खेळणे सुरू केले. परंतु, अंतिम संघात समावेश न झाल्याने त्यांनी बॉक्सिंगची सुरुवात केली. बॉक्सिंगमध्ये अनेक पदके जिंकली. १९६४ मध्ये जपानमध्ये आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत पेटकर यांनी रौप्यपदक जिंकले. परंतु, १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर त्यांचे आयुष्य पूर्ण बदलले. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर शत्रूशी लढताना पेटकर यांच्या डोक्यावर, पाठीवर गोळ्या लागल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. दोन वर्षे ते कोमात होते. त्यांना स्वत:चे नावही आठवत नव्हते. परंतू, मृत्यूशी झुंज त्यांनी जिंकली. आयुष्यभरासाठी अपंगत्व आले. मात्र, पेटकर यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी जलतरणात उतरण्याचा निर्णय घेतला. तिथूनच त्यांचा पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचा प्रवास सुरू झाला. १९७२ मध्ये पॅराऑलिम्पिकमध्ये पेटकरांनी जलतरणात भाग घेतला. त्या वेळी ३७.३३ सेकंदांत त्यांनी ही स्पर्धा जिंकत देशाचे नाव उंचावले आणि ५० मीटर फ्री स्टाइल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. पेटकरांच्या पदकतालिकेत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १२ सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर ३४ सुवर्ण आणि राज्यस्तरीय ४० सुवर्णपदकांचा समावेश आहे.

हेही वाचा…लोणावळ्यात कायमस्वरुपी दिवसा जड वाहनांना बंदी; मुंबई-पुणे महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने

या अनुभवावर पेटकर म्हणाले, की मला बॉक्सिंग, कुस्ती, हॉकी, पोहण्यासह खेळात रस होता. देशाची सेवा करण्याचे माझे स्वप्न होते. त्यामुळे मी सैन्यात भरती झालो. युद्धादरम्यान मला नऊ गोळ्या लागल्या. एक गोळी माझ्या मणक्याला लागली आणि ती अजूनही आहे. त्यावर मात करत पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि जागतिक विक्रमही केला, जो माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण आहे.

‘अभिनेता कार्तिकने माझी व्यक्तिरेखा अतिशय उत्तमपणे साकारली आहे. हा चित्रपट पाहून अनेकांच्या आयुष्यातील नैराश्य जाईल. एका सैनिकाच्या संघर्षाची कहाणी जगासमोर आली, याचा विलक्षण आनंद आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही हा चित्रपट पाहिला आहे. लष्करातील सर्व अधिकारी कुटुंबासह चित्रपट पाहण्यास उपस्थित होते,’ असे पेटकर म्हणाले.

हेही वाचा…पुणेकरांना गुड न्यूज! स्वारगेटहून आता थेट मंत्रालयासाठी शिवनेरी सुरू

ग्रामीण भागातील मुलांमध्येही खेळासाठी आवश्यक असलेले कौशल्य, चिकाटी पुरेपूर आहे. मात्र, त्यांना संधी मिळू शकत नाही. शासनाने गावपातळीवर क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देणे आवश्यक आहे. जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांमधील कौशल्य समोर येईल. आणि तेसुद्धा देशासाठी विविध पदके मिळवतील. – मुरलीकांत पेटकर