पुणे : घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली. उन्हाच्या कडाक्यामुळे फळभाज्यांची आवक कमी होत असून, काकडी, फ्लाॅवर, ढोबळी मिरची, गाजर, घेवड्याच्या दरात वाढ झाल्यााची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, राजस्थानातून १ टेम्पो गाजर, हिमाचल प्रदेशातून ५ ते ६ ट्रक मटार, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमूग शेंग, तसेच २ टेम्पो पावटा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून १४ ते १५ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १०ते १२ टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३० ते ३५ ट्रक बटाट्याची आवक झाली.
कोथिंबिर, मेथीच्या दरात वाढ
कोथिंबिर,मेथीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात कोथिंबीर ७५ हजार जुडी, मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली. अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ८०० ते १५००, मेथी – १२०० ते २०००, शेपू – ८०० ते १०००, कांदापात- ८०० ते १५००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ३०० ते ५००, अंबाडी – ३०० ते ६००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ६००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ३००-६००, पालक- ८००- १२००
चिकूच्या दरात घट
चिकूच्या दरात घट झाली आहे. कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंब, संत्री, मोसंबी, लिंबांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ३५ ते ४० टन, संत्री ४ ते ५ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ३० ते ४० टेम्पो, खरबूज २० ते २५ टेम्पो, चिकू दोन हजार खोकी, पेरू २०० ते २५० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ६ ट्रक अशी आवक झाली.