आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदीचे सर्रास उल्लंघन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारुबंदीचे उल्लंघन करून होणारी दारुविक्री, अवैध धंदे, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीमधील वाढता सहभाग अशा अनेक समस्या आहेत. नियोजित चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत संमिश्र लोकवस्ती असल्यामुळे भुरटय़ा गुन्ह्य़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुंडांकडून होणारी तोडफोड, कुदळवाडीसारख्या संवेदनशील भागात असलेली गुन्हेगारी ही येथील खरी समस्या आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये आळंदी आणि चिखली पोलीस ठाण्यांचा नव्याने समावेश झाला आहे. नियोजित चिखली पोलीस ठाणे जागा मिळाल्यानंतर सुरू होणार आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य सरकारने दारुविक्रीला बंदी घातली आहे. मात्र, बंदीचे उल्लंघन करून सर्रासपणे दारु विक्री होते. कोयता गँगच्या नावाने या भागात गुन्हेगारांची टोळी कार्यरत आहे. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढत असल्याने गुन्हेगारीमध्ये त्यांचा वावर वाढला आहे. अवैध प्रवासी वाहतूकही येथे मोठय़ा प्रमाणात चालते. प्रमुख तीन मार्गावर ही वाहतूक चालते. याशिवाय मटका, भुरटय़ा चोऱ्या, गावठी दारुच्या भट्टय़ाचे व्यवसाय राजरोसपणे चालतात.

चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश तसेच इतर काही राज्यांतून आलेल्या कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. याशिवाय राज्याच्या इतर जिल्ह्य़ांतून आलेल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे संमिश्र नागरीकरण झालेल्या चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरटी गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढत चालली आहे. खुन्नस काढणे, वाहनांची तोडफोड, दहशत पसरविण्यासाठी आरडाओरड करत फिरणे आदी प्रकार नित्याचे झाले आहेत. मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशातून गावठी पिस्तुले आणून त्यांची विक्री करणाऱ्यांची संख्याही या भागात आढळते. चिखली घरकुल येथे वाहने तोडफोड आणि दहशत पसरविण्याचे प्रकार नेहमी घडतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

आळंदी, चिखलीतील समस्या

  • आळंदीत दारुबंदीचे उल्लंघन, अवैध धंद्याचे वाढते प्रमाण
  • चिखलीत गुंडगिरीच्या आकर्षणातून वाहन तोडफोड, दहशत पसरविण्याचे प्रकार
  • कुदळवाडीसारख्या संवेदनशील भागात दहशतवादी कारवायांतील गुन्हेगारांचा वावर
  • गावठी कट्टय़ांची बेकायदा विक्री