‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांबरोबर होणाऱ्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पुढील बैठकीची तारीख बदलली असून आता ही बैठक मंगळवार ऐवजी बुधवारी (७ ऑक्टोबर) मुंबईतच ‘फिल्म डिव्हिजन’मध्ये होणार आहे, अशी माहिती संचालक प्रशांत पाठराबे यांनी दिली. आधी ही बैठक दिल्लीत होणार होती.
१ ऑक्टोबरला मंत्रालयाशी विद्यार्थ्यांची लागोपाठची दुसरी बैठक झाली होती. विद्यार्थी आपल्या मागण्यांमध्ये सारखा बदल करत असल्यामुळेच तोडग्याला उशीर होत असल्याचे मत या बैठकीनंतर प्रशासनातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात आले होते.
विद्यार्थी संघटनेने संपाच्या गेल्या ११२ दिवसात कधीही आपल्या मागण्या बदललेल्या नाहीत, असे स्पष्टीकरण याबाबत विद्यार्थी प्रतिनिधी यशस्वी यांनी दिले. ते म्हणाले,‘एफटीआयआय सोसायटीचे अध्यक्ष गजेंद्र चौहान व इतर चार सदस्य हे एका चुकीच्या प्रक्रियेची प्रतीके असल्यामुळे त्यांना हटवायला हवे, असे आम्ही म्हणत आहोत. २५ जुलैला झालेली बैठक मागील दाराने झाली होती. सरकारने या बैठकीद्वारे आमच्यासमोर एक पर्याय ठेवल्यानंतर त्याबद्दल खात्री करून घेण्याचा आमचा प्रयत्न होता, याचा अर्थ आम्ही त्या पर्यायाची मागणी केली असा होत नाही. एफटीआयआयच्या समस्या सोडवणे ही नियामक मंडळ व अध्यक्षांची जबाबदारी आहे. यातही विद्यार्थ्यांनी वेगळी मागणी केली असे नव्हे.’
या बैठकीविषयी यशस्वी म्हणाले,‘आमच्या मागण्या मंत्रालयातर्फे लिहून घेतल्या गेल्या आणि त्वरित निर्णय घेणे आपल्या अधिकारात नसल्यामुळे तिसरी बैठक ठरवत असल्याचे आम्हाला सांगितले गेले. या तिसऱ्या बैठकीत मंत्रालयाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. अद्याप सरकारशी बोलणी सुरू असून त्याचे तपशील देता येणार नाहीत.’