ग्रामदैवत कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, शनिवारवाडा, तळ्यातला गणपती, राजा केळकर संग्रहालय या महत्त्वाच्या स्थानांसह शिक्षण आणि संस्कृतीचे माहेरघर ही पुण्याची ओळख. एके काळी चित्रपटनिर्मितीचे केंद्र असलेल्या पुण्यामध्ये प्रभात स्टुडिओच्या जागेवर राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेची (एफटीआयआय) स्थापना झाली. चित्रपटाच्या विविध तांत्रिक गोष्टींमध्ये पारंगत मनुष्यबळ घडविणारी संस्था असा लौकिक संपादन केलेल्या या संस्थेमध्ये नुकताच आगळावेगळा लघुपट महोत्सव झाला.

‘पूना इन एफटीआयआय फिल्म्स’अंतर्गत जुन्या पुण्याची नव्याने ओळख करून देणारे १४ लघुपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळाली. १९६४ साली निर्मिती झालेल्या ‘वन डे’ या लघुपटाने या महोत्सवाची सुरुवात झाली. विविध जाती आणि आर्थिक स्तरांतील नागरिकांचे वास्तव्य असलेल्या खेड्यामध्ये कशी शांतता नांदत होती, हे १९ मिनिटे कालावधीच्या या लघुपटातून पाहता आले. सार्वजनिक वाहतूक आणि पायाभूत सुविधा याअंतर्गत पुणे आणि मुंबई या शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’ या रेल्वेच्या लोकप्रियतेचे गमक ११ मिनिटांच्या कालावधीमध्ये पडद्यावर पाहता आले. पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या पीएमटी सेवेविषयीची माहिती ‘सर्व्हिस ऑफ पीएमटी’ या नऊ मिनिटांच्या लघुपटामध्ये अनुभवता आली. ‘डे ॲट द रेसकोर्स’ या लघुपटामध्ये रेसकोर्सवरील अश्वशर्यती पाहता आल्या. हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरची कार्यपद्धती ‘ए रोमान्स इन द स्काय’ या लघुपटातून दिसली. १९६६ मध्ये निर्मिती झालेल्या या लघुपटामध्ये त्या काळी विद्यार्थी असलेल्या शबाना आझमी आणि कंवलजित यांचे रुपेरी पडद्यावर दर्शन झाले.

‘आर्ट अँड कल्चर’ विभागामध्ये ‘भीमसेन जोशी’ हा १९६९ मध्ये निर्मिती करण्यात आलेला दहा मिनिटे कालावधीचा लघुपट पाहता आला. ‘मिस्टर केळकर अँड हिज म्युझिअम’ या लघुपटातून एका माणसाचा संग्रह असा लौकिक असलेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालय कॅमेऱ्याद्वारे जवळून पाहता आले. संग्रहालयाचे संस्थापक काकासाहेब केळकर यांची मुलाखत हे या लघुपटाचे वैशिष्ट्य ठरले. ‘बिफोर द थर्ड बेल गोज’ हा लघुपट मराठी रंगभूमीचै वैभव दाखविणारा होता. विजय तेंडुलकर यांचे ‘अशी पाखरे येती’ नाटकाचे वाचन येथपासून ते नाटक रंगमंचावर सादर होईपर्यंतच्या विविध टप्प्यांचे दर्शन दहा मिनिटे कालावधीच्या लघुपटातून घडले. ‘फिल्म गेझ’ या सात मिनिटांच्या लघुपटातून पुण्यातील विविध एकपडदा चित्रपटगृहांची सफर घडली.

‘एज्युकेशन अँड हेल्थकेअर’ अंतर्गत डाॅ. मणिभाई देसाई यांनी स्थापन केलेल्या उरुळीकांचन येथील निसर्गोपचार केंद्राच्या कार्यावर आधारित ‘नेचर क्युअर’, ‘होम सायन्स’, येरवडा मनोरुग्णालयाच्या कार्याचा वेध घेणारा ‘मेंटल हाॅस्पिटल’ हा लघुपट, सिम्बायोसिस संस्थेची स्थापना होण्यास केंद्रीभूत ठरलेला क्षण असलेला ‘ॲन आफ्रिकन स्टुडंट्स इन पूना’ आणि ‘डाॅ. कानेटकर – ए यंग सर्जन’ हे लघुपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना लाभली.

चित्रपटांचे ज्येष्ठ अभ्यासक समर नखाते यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या या लघुपटांचे महत्त्व अधोरेखित केले. इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी साधलेल्या संवादातून जुन्या पुण्याची महती उलगडली. या आगळ्यावेगळ्या चित्रपट महोत्सवाला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद न दिला तरच नवल!

vidyadhar.kulkarni@expressindia.com