‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी आता तातडीने संप मागे घेतला नाही, तर त्यांच्यावर संस्थेकडून कडक प्रशासकीय कारवाई होऊ शकेल, असे सांगून संस्थेचे संचालक डी. जे. नरेन यांनी विद्यार्थ्यांना कोणताही विलंब न करता अभ्यासाला सुरुवात करण्याचा आदेश दिला आहे.
नरेन यांनी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नाचिमुथ्थू हरिशंकर यांच्या नावे मंगळवारी हे पत्र काढले आहे. हे आदेश आपण आपल्याच अधिकारात काढले असल्याचे नरेन यांनी पत्रकारांना सांगितले. याहून अधिक काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. या पत्राचा मजकूर असा आहे – ‘संचालकांनी विद्यार्थ्यांना लेखी व तोंडी स्वरूपात संप तातडीने बंद करून शैक्षणिक कामाला सुरुवात करण्यास सांगितले आहे. याचे पालन न करता संप सुरूच ठेवल्यास विद्यार्थ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते. यात विद्यार्थ्यांना काढून टाकण्याची कारवाईही होऊ शकेल. या कारवाईस विद्यार्थी स्वत: जबाबदार असतील.’
पत्राबद्दल नाचिमुथ्थू यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देऊन विद्यार्थी आपली भूमिका गुरुवारी जाहीर करतील असे सांगितले.