‘एफटीआयआय’मध्ये उपोषणाला बसलेल्या तीन उमेदवारांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याला शुक्रवारी दुपारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिलाल सवाद असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यावेळी संस्थेचे निबंधक यू. सी. बोडके तिथे उपस्थित होते.
अलोक आरोडा, हिमांशू शेखर आणि हिलाल सवाद या तीन विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून संस्थेच्या आवारात उपोषण सुरू केले आहे. याबाबत विद्यार्थी प्रतिनिधी विकास अर्झ म्हणाले, ‘विद्यार्थ्यांशी कोणत्याही प्रकारे थेट चर्चा करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसत नाही. आता तीन विद्यार्थ्यांचा जीव पणाला लागला असून विद्यार्थ्यांची शासनाशी चर्चा होणे अत्यावश्यक आहे.’ विद्यार्थ्यांच्या उपोषणाबाबत आपण मंत्रालयाला कळवले असून, आपल्याला मंत्रालयाकडून काहीही सूचना मिळाली नसल्याचे संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.