पुणे : सामाजिक संस्थांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सोशल स्टॉक एक्स्चेंज’वर नोंदणीकृत होणारी ‘फ्युएल’ (फ्रेन्डस् युनियन फॉर एन्जार्यजिंग लाइव्हज) शिक्षण संस्था ही पुण्यातील पहिली संस्था ठरली आहे. या माध्यमातून युवकांच्या कौशल्यविकास आणि समावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे.
फ्युएल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी या बाबतची माहिती दिली. फ्युएलच्या सीओओ मयूरी देशपांडे व विभागप्रमुख डाॅ. प्राची अहिरराव या वेळी उपस्थित होत्या. शेअर बाजाराच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली ‘सोशल स्टॉक एक्स्चेंज’ ही नवी कल्पना आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना यात नोंदणी करून निधी उभारणी करता येते. आतापर्यंत देशभरातील सुमारे ७० संस्था नोंदणीकृत झाल्या आहेत. त्यात फ्युएल शिक्षण संस्थेचाही समावेश आहे.
‘सोशल स्टॉक एक्स्चेंज’वर अत्यंत पारदर्शक, काटेकोर कामकाज करावे लागते. आतापर्यंत फ्युएल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून २९०७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम केले आहेत. हे विद्यार्थी कमी उत्पन्न गटातील आहेत. अत्यंत काटेकोर चाचण्यांतून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना ‘सामाजिक उत्तरदायित्त्व निधी’द्वारे (सीएसआर) शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मोफत शिक्षण देण्यात आले. संस्थेने आतापर्यंत सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी सीएसआरच्या माध्यमातून उभा केला आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून भूगाव येथे कौशल्य तंत्रज्ञान विद्यापीठ उभारण्यास मान्यता मिळाली आहे. विद्यापीठात कौशल्याधारित तंत्रज्ञान, व्यवस्थापन असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. त्यासाठी उद्योग क्षेत्राचे सहाय्य असणार आहे. परदेशातील ऑक्सफर्ड, केंब्रिजसारखी मोठी विद्यापीठे उद्योगांच्या बळावर काम करतात. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सैद्धांतिक शिक्षणासह प्रत्यक्ष अनुभव, नोकरीच्या संधी मिळणार आहेत. भविष्यातील कौशल्यांची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात येतील, असेही डॉ. देशपांडे यांनी नमूद केले.
भविष्यवेधी कौशल्य परिषदेचे आयोजन
संस्थेतर्फे फ्यूचर स्किल्स समिट २०२६ शुक्रवारी (६ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच नामांकित कंपन्यांतील मनुष्यबळ अधिकारी, सीएसआर क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. भविष्यातील कौशल्य, इंडस्ट्री ५.०, मानवी केंद्रित शिक्षण, रोजगार क्षमता, नेतृत्त्व तयारी, सीएसआर आधारित कौशल्य विकास या विषयांवर सत्रे होणार असल्याचे डॉ. देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

