प्रतिभा आणि शिक्षणाची आवड असलेल्या, पण आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळा आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘फ्युएल’ (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्ह्ज) ही संस्था काम करते. या संस्थेचे संस्थापक डाॅ. केतन देशपांडे यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
‘फ्युएल’ची कल्पना कशी सुचली? काम कसे चालते?
– ‘फ्युएल’ हे मोफत शिक्षण देणारे कौशल्याधारित विद्यापीठ आहे. याद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्य आणि रोजगार यांची संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षेत्रात आहोत. शिक्षणापासून रोजगारापर्यंतच्या प्रवासात विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा एक महामार्ग ‘फ्युएल’ने तयार केला आहे. या मार्गावरून प्रवास केल्यास शिक्षणाची इच्छा असणारे, पण आर्थिक परिस्थितीमुळे ते करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ध्येयापर्यंत पोहोचविण्याचा, त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे.
मी शिकत असताना मला जाणवले, की आपल्या अवतीभोवती अनेक प्रतिभावान विद्यार्थी आहेत. पण, त्यांच्या बुद्धिकौशल्याचा उपयोग करणारा मार्ग त्यांना सापडत नाही. तो शोधण्यासाठी २००७ मध्ये ‘फ्युएल’ची स्थापना झाली. त्या वेळी सर्वांत आधी मी करिअर मार्गदर्शनावर पुस्तक लिहिले, ज्याचे प्रकाशन माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले. त्यांच्या प्रेरणेने हे विद्यापीठ उभे राहिले. ‘फ्युएल’ सध्या एका अनोख्या प्रारूपावर काम करत आहे, ज्यामध्ये विविध शाळांचा विकास केला जात असून, पद्मभूषण डॉ. युसूफ हमीद यांनी ‘फ्युएल’चे ‘स्कूल ऑफ सायन्स’ दत्तक घेतले आहे.
आजपर्यंत किती विद्यार्थ्यांनी याद्वारे शिक्षणाचा लाभ घेतला?
– या उपक्रमाद्वारे २.९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम केले असून, दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले आहे. सुमारे २९०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. आज हजारो विद्यार्थी आयटी, बीएफएसआय आणि विविध कॉर्पोरेट क्षेत्रांत नोकरी अथवा व्यवसाय करत आहेत. सध्या सुमारे साडेचारशे विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यांमधून आलेले आहेत. यामध्ये ५० ते ६५ टक्के मुलींचा सहभाग आहे.
विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाते?
– विद्यार्थी निवड पूर्णपणे पारदर्शक आणि त्या-त्या विद्यार्थ्याच्या गरजेवर आधारित असते. त्यात कौटुंबिक, आर्थिक पार्श्वभूमी, विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता, ॲप्टिट्यूड टेस्ट, प्रत्यक्ष मुलाखत, गरजेनुसार गृहभेट यांद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या उपक्रमात विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
विद्यार्थ्यांना कोणकोणते अभ्यासक्रम शिकवले जातात?
– बीबीए, बीबीए-सीए (कम्प्युटर ॲप्लिकेशन्स), एमबीए, एमसीए हे अभ्यासक्रम, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा ॲनलिस्ट, पायथॉन, जावा, क्लाउड अथवा एडब्यूएस (ॲमेझाॅन वेब सर्व्हिसेस) असे कौशल्याधारित शिक्षणदेखील ‘फ्युएल’मध्ये दिले जाते. याशिवाय बँकिंग अँड फायनान्स (बीएफएसआय), रोजगारक्षमता कौशल्य, उद्योजकता विकास आदींचे अभ्यासक्रमही राबविले जातात. हे सर्व अभ्यासक्रम उद्योगांच्या गरजांनुसार तयार करण्यात आले आहेत, ज्यायोगे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळतात.
या उपक्रमासाठी आर्थिक बाजू कशी सांभाळली जाते?
– या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च विविध कंपन्यांच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रमांद्वारे उचलला जातो. विद्यार्थ्याकडे उपजत गुण असतील, त्याच्याकडे शिक्षण घेण्याची हातोटी असेल, कौशल्ये नसली, तरी ती मिळविण्याची इच्छा असेल, अशा वंचित विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठामार्फत शिक्षण दिले जाते. त्यांना शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासाधारित ज्ञान दिले जाते. कंपन्यांच्या सहकार्याने विद्यार्थी थेट उद्योगाशी जोडले गेले आहेत. ‘कमवा आणि शिका’ या संकल्पनेवर विद्यापीठ काम करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक प्रभावी आणि परिवर्तन घडविणारा प्रयत्न आहे.
shriram.oak@expressindia.com
