पुणे : पश्चिम आशियातील युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडाला आहे. त्यातून देशात इंधन दरवाढीचे चक्र सुरू झाले आहे. पेट्रोलच्या दरात १५ मेपासून चार वेळा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचा दर आता प्रतिलिटर १११ रुपयांवर गेल्यामुळे नोकरदारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नोकरदारांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘वर्क फ्रॉम होम’साठी साकडे घातले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
देशभरात १५ मेपासून अकरा दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ७.३८ रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलिटिर ७.४८ रुपये वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोलच्या दराने प्रतिलिटर १११ रुपये तर डिझेलच्या दराने प्रतिलिटर ९८ रुपयांची पातळी ओलांडली आहे. इंधन दरवाढीने महागाई प्रचंड वाढली आहे. खाद्यतेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट फटका सामान्य माणसाला बसत आहे. पेट्रोल महागल्याने कार्यालयात रोज जाण्यायेण्याचा खर्चही वाढला आहे. यामुळे नोकरदारांना महिन्याचे आर्थिक गणित जुळवताना कसरत करावी लागत आहे. या परिस्थितीत ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला दिला होता. काही बोटावर मोजणाऱ्या कंपन्या वगळता इतर कंपन्यांनी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संघटना ‘नॅसंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट’ने ( नाइट्स) म्हटले आहे की, जागतिक पातळीवर ऊर्जा बाजारपेठेत मोठी उलथापालथ घडत आहे. यामुळे दररोजचा प्रवास ही आता महागडी चैन बनू लागली आहे. इंधन टंचाई आणि देशातील परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी सरकारने तातडीने ‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घ्यावा. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे उत्पादकतेत कोणतीही घट होत नाही हे आधीही दिसून आले आहे.
दुसरी संघटना ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ने म्हटले आहे की, पेट्रोलचे दर आता प्रतिलिटर १११ रुपयावर पोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्क फ्रॉम होम’चे आवाहन कंपन्यांना केले होते. या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय तातडीने घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तत्काळ पावले उचलून ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करावे.
करोना काळात प्रयोग यशस्वी
करोना संकटाच्या काळात देशातील बहुतांश आयटी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धती राबवली होती. त्या काळात कर्मचाऱ्यांची उत्पादकता टिकून राहिल्याचे अनेक कंपन्यांनी मान्य केले होते. मात्र, करोना संकटानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. आता इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी आणि वाढता प्रवास खर्च यामुळे कर्मचारी पुन्हा वर्क फ्रॉम होमची मागणी करीत आहेत. पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि गुरुग्रामसारख्या आयटी हबमध्ये दररोज वाहतूक कोंडीत कर्मचाऱ्यांना तासनतास अडकून पडावे लागते. वर्क फ्रॉम होम सुरू केल्यास वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासह इंधनाचा वापर आणि खर्चही कमी होईल, अशी भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
