पिंपरी : फुगेवाडीतील विषारी दारूकांडामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा रोष सोमवारी सायंकाळी उशिरा उफाळून आला. या प्रकरणातील आरोपींना तपास आणि पंचनाम्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने घटनास्थळी आणल्यानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना परत नेत असताना नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काहींनी आरोपींकडे धाव घेण्याचाही प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला.
सीआयडीचे पथक सोमवारी सायंकाळी आरोपींना घेऊन फुगेवाडीत दाखल झाले होते. घटनास्थळी पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र तपास सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना पुन्हा वाहनाकडे नेण्यात येत असताना नागरिकांचा संताप अचानक उसळला. दारूकांडात मृत्यूमुखी पडलेल्या आणि बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड रोष असल्याचे यावेळी दिसून आले. काही नागरिकांनी आरोपींना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी थेट त्यांच्याकडे धाव घेतली.
यावेळी एका ज्येष्ठ महिलेने आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत संताप व्यक्त केला. परिस्थिती बिघडण्याची चिन्हे दिसताच सीआयडी आणि पोलीस बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी आरोपींभोवती सुरक्षा कवच निर्माण करून परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाचा रोष वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी आरोपींना तत्काळ वाहनात बसवून तेथून हलवले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दोन रूग्णांची प्रकृती चिंताजनक
फुगेवाडी येथील विषारी दारू कांडातील प्रकृती खालावलेल्या दहा रूग्णांपैकी वायसीएम रूग्णालयात उपचार घेत असलेल्या दोन रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, तर औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या तीन जणांची प्रकृती स्थिर आहे. तसेच, ससून आणि खासगी रुग्णालयात प्रत्येकी एकावर उपचार सुरू आहेत.
