पुणे : पुण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि श्रद्धेचा भाग असलेल्या ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचे जतन आणि संवर्धनासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे.दरम्यान, या कामाला रविवारी सुरुवात करण्यात आली. त्यासाठी कसबा मतदारसंघाचे भाजप आमदार हेमंत रासने यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. कसबा गणपती ट्रस्ट अध्यक्ष विनायक ठकार, विश्वस्त संगीता ठकार, चतुर्थी कसबा गणपती मंडळ अध्यक्ष श्रीरंग होनप, सुनील पारखी, सुहास कुलकर्णी, अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे यावेळी उपस्थित होते.

श्री कसबा गणपती मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मानाचा गणपती मानला जात आहे. हे मंदिर आपल्या परंपरेचे प्रतीक आहे. त्याच्या पहिल्या मजल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी निधी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या निधीमुळे मंदिराच्या पहिल्या मजल्याचे ऐतिहासिक मूल्य जपत सुरक्षित जतन आणि देखभाल होणार आहे. त्यामुळे हे काम पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी मोलाचे ठरेल, असे रासने यांनी सांगितले.