ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी आज पहाटे निधन झाले. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्माशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. समाजिक क्षेत्रावर व्यंगचित्र रेखाटणारे व्यक्तीमत्व काळाच्या पद्याआड गेल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
महापौर मुक्ता टिळक, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, वाहतूक पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, मुरुली लाहोटी यांसह नागरिक मोठ्या संख्येने तेंडुलकरांच्या अंत्यविधीला उपस्थित होते.




“मंगेश तेंडुलकर यांच्या निधनामुळे समाजात एक पोकळी निर्माण झाली असून त्यांचे प्रत्येक सामाजिक घटकावरील व्यंगचित्र हे कायम स्मरणात राहील”, अशा शब्दांत महापौर मुक्ता टिळक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“आजवर अनेक व्यक्ती सामाजिक क्षेत्रात काम करताना आपण पाहिल्या. मात्र त्यातील मंगेश तेंडूलकर हे वेगळे होते. त्यांची व्यंगचित्रे ही कायम अमर राहतील आणि पुढच्या पिढीला संदेश देतील” अशा भावना पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केल्या.
वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले, “तेंडुलकर सरांनी नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी कायम मार्गदर्शन केले आहे. समाजातील हे एकमेव व्यक्तिमत्व होते. जे या ही वयामध्ये शहरातील विविध सिग्नलवर थांबून व्यंगचित्राच्या माध्यमातून संदेश देण्याचे काम करत होते.”
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, “व्यंगचित्राच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर त्यांनी मार्मिक टिपण्णी केली असून त्यांचे व्यंगचित्र हे एखाद्या लेख किंवा कविता एवढी प्रभावी असायचे. आज आपल्यातून सरस्वतीचा पुत्र गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.”
“मंगेश तेंडूलकर सरांची चित्र पाहत मी मोठा झालो असून त्यांच्या चित्रामधून प्रेरणा घेऊन या क्षेत्रात आलो. तेव्हा आणि आजही त्यांची व्यंगचित्रे प्रत्येक व्यक्तीला भावली आहेत. त्यांच्या निधनामुळे व्यंगचित्र क्षेत्राची खूप हानी झाली असून त्यांची चित्रे पुढील पिढीला संदेश देत राहतील” अशी भावना यावेळी जेष्ठ व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी व्यक्त केली.
यावेळी जेष्ठ व्यंगचित्रकार मुरुली लाहोटी म्हणाले, “मंगेश तेंडुलकर सरांनी व्यंगचित्र विषयी कोणतेही शिक्षण न घेता त्यांनी हि कला आत्मसात केली असून त्यांना देवाने दिलेली ती एक देणगी होती. ते त्यांच्या ठसठशीत रेषांमधून खूप काही सांगून जातं. त्यांनी सामाजिक विषयावर भाष्य करणारी व्यंगचित्रे रेखाटून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले.”