पुणे : ‘सध्या स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयांच्या संस्कृतीमुळे ‘फॅमिली डॉक्टर’ हरवला आहे. अशा मोठ्या रुग्णालयात एखादा रुग्ण दाखल झाला, की तो तिथल्या यंत्रणेत हरवून जातो, घाबरतो. तिथे त्याला पूर्ण वेळ सांभाळणारा एकही ‘फॅमिली डॉक्टर’ नसतो. रुग्णाला त्याच्या रोजच्या संवादासाठी ‘फॅमिली डॉक्टर’ची गरज असते. आता समाजानेच आम्हाला ‘फॅमिली डॉक्टर’ हवा आहे, अशी मागणी करण्याची वेळ आली आहे,’ अशी खंत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केली.
‘फॅमिली डॉक्टर’ची गरज ओळखून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात देशातील पहिला ‘इंटिग्रेटेड कोर्स इन फॅमिली मेडिसीन’ सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समवेदना संस्थेच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कानिटकर यांनी ‘जिद्द, शिस्त आणि आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र कानिटकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजा आणि रेणू दांडेकर, संस्थेच्या सल्लागार समितीचे सदस्य राजीव साबडे, व्यवस्थापक अमर पवार उपस्थित होते. याच कार्यक्रमात चंद्रकांत आरोळे आणि माधवी राऊत यांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वार्षिक अहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.
‘सार्वजनिक आरोग्यात सुधारणा होत नाही. लोकांचा डॉक्टरांवरचा विश्वास उडाला आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते डॉक्टरांना न्यायालयात खेचतात आणि ज्यांच्याकडे नाहीत ते दवाखान्यात जाऊन डॉक्टरांवर हात उचलतात, अशी परिस्थिती आहे. आरोग्य सेवा इतकी महाग झाली आहे, की कोणावर विश्वास ठेवायचा, हा प्रश्न पडतो. डॉक्टर हा समाजातील सर्वांत आदराचा घटक होता. मात्र, आज ते नाते विस्कळीत झाले आहे,’ असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी नमूद केले.
भविष्यात डॉक्टरांचे काय होणार ?
डॉ. कानिटकर म्हणाल्या, ‘भविष्यात डॉक्टरांचे निम्मे काम अभियंते करतील. आता निदानासाठीही ‘एआय’चा वापर केला जातो. लवकरच रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट यांची गरज कमी होईल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल, आजाराचे निदान सहज शक्य होईल. शल्यविशारदाची जागा यंत्रमानवाधारित शस्त्रक्रिया घेईल. केवळ मानसिक आरोग्य, लहान मुलांचे आरोग्य आणि बाळांतपणांसाठी मानवी स्पर्शाची गरज भासेल.
इतर सर्व वैद्यकीय सेवांमध्ये तंत्रज्ञान वरचढ ठरेल. त्यामुळे डॉक्टरांनी बुद्धी आणि हृदय यांचा समतोल राखून काम केले पाहिजे.’ ‘समाजाला डॉक्टरांपेक्षा परिचारिका, निमवैद्यकीय आणि आरोग्य सुविधा देणाऱ्यांचीच अधिक गरज भासणार आहे. आताच इस्रायलसारख्या देशांना वृद्धांची काळजी घेणारे हजारो लोक हवे आहेत. त्यांना फक्त परिचारिकांची नाही, तर कुशल मनुष्यबळाची गरज आहे. अशा काळात समाजाने डॉक्टर म्हणजे सर्वश्रेष्ठ ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. रुग्णांची काळजी घेणाऱ्या सर्वांना सारखे महत्त्व दिले पाहिजे, तेव्हाच आपली आरोग्य व्यवस्थाही सुधारेल,’ असेही त्यांनी सांगितले.
