संघटनांच्या इच्छापूर्तीसाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबली?

अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबवण्यात येते आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे शिक्षक आणि प्राचार्य हवालदिल झाले आहेत.

अकरावीला विशिष्ट महाविद्यालयच हवे असा हट्ट धरून बसलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय बदलून मिळण्यासाठीचे अर्ज शिक्षण विभागाकडून अजूनही स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे अद्यापही अकरावीची सहावी फेरी संपलेली नाही. प्रवेश प्रक्रियेत सतत डोकावणाऱ्या संघटनांच्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबवण्यात येते आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे शिक्षक आणि प्राचार्य हवालदिल झाले आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अकरावीची नियमित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही संपलेली नाही. जून महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत प्रवेशाच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. तरीही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची सहावी समुपदेशन फेरीही घेण्यात आली. तब्बल तीन दिवस समुपदेशन फेरी होऊनही अद्याप पाचशे विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश हवा म्हणून हटून बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांचे, संघटनांच्या वशिल्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय बदलून मिळण्याचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सोमवारी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रवेश प्रक्रियेवरील शिक्षण विभागाचे नियंत्रणच सुटू लागल्याचे दिसत आहे. संघटनांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच प्रवेश प्रक्रिया लांबवण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षण विभागाच्या या निवांत कारभारामुळे महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिक्षक मात्र हवालदिल झाले आहेत. अकरावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटून गेला. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकेही सुरू झाली. मात्र, तरीही महाविद्यालयामध्ये रोज नवे प्रवेश होत आहेत. त्यातच नियमित परीक्षा संपल्यानंतर दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या विद्यार्थ्यांची प्रवेश फेरी सुरू होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांचा पुढील महिनाही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतच जाण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे शिक्षकांच्या संचमान्यतेची प्रक्रियाही लांबणार आहे. गेल्या वर्षी तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची मान्यता प्रक्रिया न झाल्यामुळे त्यांचे पगार थकले आहेत. या वर्षीही मान्यतेची प्रक्रिया खोळंबण्याची भीती शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महाविद्यालयांवर कारवाईचे नाटक?
ऑफलाईन किंवा नियमबाह्य़ तुकडय़ांमध्ये प्रवेश करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याच्या गर्जना शिक्षण विभागाने केल्या. मात्र, एकीकडे कारवाईचे पत्र द्यायचे आणि दुसरीकडे त्याच महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करायचे, अशा घटना समोर येत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांवर दाखवण्यापुरतीच कारवाई केली जात आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fyjc admission college round student union