पुणे : राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता मुलींसाठी विशेष प्रवेश फेरीचे राबवली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १३ जुलै रोजी गुणवत्ता यादी आणि पात्रता गुण (कट-ऑफ) जाहीर करण्यात येणार असून, १३ आणि १४ जुलै रोजी विद्यार्थिनींना प्रवेश निश्चित करणे, नकार देणे किंवा प्रवेश रद्द करता येणार आह

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत नोंदणी केलेल्या १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांपैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तीन नियमित फेऱ्यांनंतर पहिल्या विशेष फेरीसाठी ४ लाख ८४ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना ३ जुलै रोजी महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले. ७ जुलैपर्यंत ३ लाख २४ हजार १०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यापैकी ३ लाख १२ हजार ९८३ प्रवेश कॅपअंतर्गत, तर ११ हजार ११९ प्रवेश राखीव कोट्यातून झाले आहेत. पहिल्या विशेष फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आज (८ जुलै) सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

१५ जुलैपासून नियमित अध्यापन सुरू

प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित आणि एक विशेष फेरी झाली आहे. त्यामुळे १५ जुलैपासून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नियमित अध्यापन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुलींसाठीच्या विशेष प्रवेश फेरीचे वेळापत्रक

  • १० व ११ जुलै – नवीन नोंदणी, अर्ज दुरुस्ती, पसंतीक्रम भरणे व अर्ज अंतिम करणे
  • १३ जुलै – महाविद्यालय वाटप यादी (गुणवत्ता यादी), पात्रता गुण (कट-ऑफ) जाहीर
  • १३ व १४ जुलै – प्रवेश निश्चित करणे, नाकारणे किंवा रद्द करणे
  • १४ जुलै – पुढील विशेष प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर
  • १५ जुलै – महाविद्यालयीन कामकाज, नियमित वर्ग सुरू
  • १६ जुलै – रिक्त जागांची यादी जाहीर