पुणे : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची निवडयादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या फेरीत राज्यभरातील आठ विभागांमधून महाविद्यालयांचे पसंतिक्रम नोंदवलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५.७४ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. मुंबई विभागातील सर्वाधिक १ लाख ३३ हजार ३२३ विद्यार्थ्यांना, त्याखालोखाल पुणे विभागातील १ लाख ९ हजार ६२३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबतची माहिती दिली. राज्यभरात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी एकूण २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी १२ लाख ५१ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवलेल्या ८ लाख ८७ हजार २६४ विद्यार्थ्यांपैकी ५ लाख ७४ हजार ९४५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले.

मुंबई विभागात सर्वाधिक ४ लाख ७७ हजार २१० जागांची क्षमता असून २ लाख १२ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केला होता. त्यापैकी १ लाख ३३ हजार ३२३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. पुणे विभागातील ३ लाख ९६ हजार २६६ जागांसाठी अर्ज अंतिम केेलेल्या १ लाख ७२ हजार ७९१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९ हजार ६२३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ६४ हजार ८६८, नाशिक विभागात ६५ हजार ६४, कोल्हापूर विभागात ५४ हजार ७७०, नागपूर विभागात ५४ हजार ९३७, अमरावती विभागात, ५८ हजार ६८६, लातूर विभागात ३३ हजार ६७४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला.

प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार, पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २९ मे ते ३ जून या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार असून, ४ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांचे कामकाज पूर्ण होईल. त्यानंतर ५ आणि ६ जूनला विदा प्रक्रिया केली जाणार आहे, तर ६ जून रोजी दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे.

शाखानिहाय प्रवेश

  • विज्ञान – ३,२३,४३१
  • वाणिज्य – १,२६,०९०
  • कला – १,२५,४२२
  • एकूण – ५,७४,९४३

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी चुरस

यंदा दहावीच्या निकालात घट झाली असली, तरी नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठी चुरस कायम आहे. दहावीच्या निकालात घट झाल्याचा परिणाम अकरावीच्या प्रवेशांवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अकरावीच्या अनुदानित, विनाअनुदानित तुकड्यांतील प्रवेशासाठीच्या पात्रता गुणांमध्ये घट झाली आहे, असे फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. डी. कुंभार यांनी सांगितले. तर विज्ञान आणि कला शाखेच्या पात्रता गुणांमध्ये यंदा वाढ जाली आहे, असे आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांनी लघुसंदेश वर अवलंबून न राहता प्रत्यक्ष ऑनलाइन खात्याद्वारे केंद्रीय कोट्यांतर्गत कनिष्ठ महाविद्यालय मिळाल्याची तपासणी करूनच प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी जावे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दहावीत मिळालेले गुण, संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे कटऑफ गुणांचा याचा विचार करून दुसऱ्या फेरीत पसंतीक्रम भरून प्रवेश अर्जाचा भाग दोन भरावा. विद्यार्थ्याने कोणत्याही कोट्यातून (केंद्रीय ऑनलाइन, अल्पसंख्याक, इनहाऊस व्यवस्थापन कोटा) एकदा प्रवेश निश्चित केल्यास तो पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जातो. – डॉ. महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक.