पुणे : आपल्या अनोख्या शब्दकळेने वाचकांवर गारूड निर्माण करणारे ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांची साहित्यसाधना आता ‘साधना’मध्ये अवतरणार आहे. आपल्या कुंचल्यातून ‘जीएं’नी चितारलेली १५ चित्रे आणि त्यांच्या नित्य वापरातील विविध वस्तू ‘साधना मीडिया सेंटर’मध्ये साकारण्यात येत असलेल्या कायमस्वरूपी संग्रहालयामध्ये साहित्यरसिकांना पाहावयास मिळणार आहेत. हा अक्षय खजिना अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर (१९ एप्रिल) पुणेकरांसाठी खुला होत आहे.
‘जीएं’च्या भगिनी नंदा पैठणकर यांनी केलेल्या विनंतीनुसार साधना मीडिया सेंटर येथे ‘जीएं’च्या साहित्यसाधनेचे कायमस्वरूपी संग्रहालय साकारण्यात येत आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी त्यासाठी पुढाकार घेत संग्रहालयासाठी मार्गदर्शन केले आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे संग्रहालय आणि वडघर (ता माण, जि. रायगड) येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक संस्थेचे साने गुरुजी यांचे संग्रहालय साकारण्यामध्ये सुनीलकुमार लवटे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ही दोन्ही संग्रहालये मी पाहिली आहेत. त्यामुळे ‘जीएं’चे संग्रहालय साकारण्याचे निश्चित झाले तेव्हा पहिल्यांदा लवटे सरांची आठवण झाली आणि जीएंच्या प्रेमापोटी त्यांनी ही विनंती आनंदाने मान्य केली, अशी माहिती साधना ट्रस्टचे विश्वस्त आणि साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी दिली.
‘‘जीएं’च्या चित्रांसह त्यांच्या वापरातील वस्तूंचे क्रांती कानडे यांनी भरविलेले प्रदर्शन पाहण्यासाठी विनोद शिरसाठ आणि सुनीलकुमार लवटे आले होते. त्या वेळी त्यांच्याशी बोलणे झाले होते. ‘जीएं’ची चित्रे आणि वस्तू कायमस्वरूपी जतन करण्याच्या प्रस्तावाला शिरसाठ यांनी मान्यता दिली. इतकी वर्षे मी सांभाळून ठेवलेला हा संग्रह जतन करण्यासाठी योग्य ठिकाणी जात आहे. ‘साधना मीडिया सेंटर’ येथे पुस्तकांचे दालन आहे. तेथे हे प्रदर्शन असेल, याचा मला आनंद आहे,’ अशी भावना नंदा पैठणकर यांनी व्यक्त केली.
असे असेल संग्रहालय
– ‘साधना मीडिया सेंटर’मध्ये पुस्तकांच्या दालनासमवेत संग्रहालय
– ‘जीएं’नी चितारलेली १५ चित्रे संग्रहालयाच्या भिंतीवर
– लेखन करण्यासाठी ‘जीए’ वापरत असलेला लाकडी डेस्क
– ‘जीएं’चा काेट, लाकडी खुर्ची, पेन, चष्मा
– ‘जीएं’च्या पुस्तकाच्या हस्तलिखित प्रती, त्यांच्या संग्रहातील पुस्तके
‘साधना मीडिया सेंटर’मधील या कायमस्वरूपी संग्रहालयामुळे लेखक ‘जीएं’ची चित्रकार ही ओळख साहित्यरसिकांना ठळकपणे अधोरेखित होणार आहे. ‘जीएं’नी चितारलेल्या चित्रांमध्ये त्यांनी काढलेले स्वत:चेच चित्र (सेल्फ पोट्रेट) पुणेकरांना पाहावयास मिळणार आहे.- विनोद शिरसाठ, विश्वस्त, साधना ट्रस्ट
