ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या अलौकिक योगदानाला सलाम करण्याच्या उद्देशातून नाटय़संपदा प्रतिष्ठानतर्फे १ फेब्रुवारीपासून घरकुल लॉन्स येथे दोन दिवसांचा गानसरस्वती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. किशोरीताई आमोणकर यांच्या गायनाची मैफल हे या महोत्सवाचे खास आकर्षण असेल.
किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर यांच्या गायनाने १ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता या महोत्सवाची सुरूवात होणार आहे. त्यानंतर किशोरीताईंच्या शिष्या आणि प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांची मैफल होणार असून उस्ताद शाहीद परवेझ यांच्या सतारवादनाने पहिल्या दिवसाची सांगता होणार असल्याची माहिती किशोरीताईंचे शिष्य व प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर आणि प्रतिष्ठानच्या विश्वस्त तरंगिणी खोत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. २ फेब्रुवारीला सकाळी साडेआठ वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या सत्रात युवा गायिका धनश्री घैसास, जयंती कुमरेश यांचे वीणावादन आणि पं. उल्हास कशाळकर यांचे गायन होणार आहे. तर, सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्रात रघुनंदन पणशीकर यांचे गायन आणि पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूरवादन होणार आहे. खुद्द गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या गायनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. नावडीकर म्युझिकल्स (यशवंतराव चव्हाण नाटय़गृहासमोर), श्रेयस सिद्धी (सातारा रस्ता), शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरू उद्यानासमोर) आणि टिळक स्मारक मंदिर येथे २४ जानेवारीपासून महोत्सवाची तिकिटे उपलब्ध होणार आहेत.