नेत्यांच्या वास्तव्याने गाडगीळ वाडा स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार

चले जाव आंदोलनामध्ये अटक झालेल्या नेत्यांची नगरच्या तुरुंगातून सुटका झाली.

पुणे : चले जाव आंदोलनामध्ये अटक झालेल्या नेत्यांची नगरच्या तुरुंगातून सुटका झाली. १९४२ मध्ये पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, बाबू राजेंद्र प्रसाद अशा दिग्गज नेत्यांनी स्वातंत्र्य आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी पुण्यात तीन दिवस राहून विचारमंथन केले होते. या नेत्यांची बैठक झाली होती शनिवार पेठेतील गाडगीळ वाडय़ामध्ये. नेत्यांच्या वास्तव्याने हा वाडा स्वातंत्र्य चळवळीचा साक्षीदार ठरला आहे.

१९४२ च्या लढय़ामध्ये नेत्यांनी स्वातंत्र्यचळवळीची दिशा ठरविण्यासाठी गाडगीळ वाडय़ामध्ये तीन दिवस मुक्काम केला होता. रविवारी (१५ ऑगस्ट) देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना गाडगीळ वाडय़ातील या जुन्या आठवणींना माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उजाळा दिला. ही आठवण मला वडील बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी सांगितली होती, असे गाडगीळ यांनी सांगितले.

अनंत गाडगीळ म्हणाले, ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ हे १९२०-३० च्या सुमारास घरासाठी जागा शोधत होते. त्यामध्ये शनिवार पेठेमध्ये ईशान्येच्या बाजूला ही जागा घेऊन त्यांनी वाडा उभारला होता. १९४२ मध्ये चले जाव आंदोलनाच्या काळात काँग्रेस वर्किंग कमिटीच्या नेत्यांना ब्रिटिशांनी अटक करून नगरच्या तुरुंगात ठेवले होते. ब्रिटिश पोलिसांनी सुटका केल्यानंतर ‘आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी जवळपास दोन दिवस राहण्याची जागा आहे का?’, असे सरदार पटेल यांनी पं. नेहरू यांना विचारले होते. त्यावर ‘काका का (काकासाहेब गाडगीळ) घर पूना में हैं, वहाँ हम रह सकते हैं’, असे नेहरू यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार तुरुंगातून सुटल्यानंतर नेहरू, पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आणि बाबू राजेंद्र प्रसाद हे नेते पुण्यात आले आणि गाडगीळ वाडय़ामध्ये त्यांनी तीन दिवस मुक्काम करून चळवळीची दिशा निश्चित केली होती. माझ्या आजीने त्यांचा पाहुणचार केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gadgil wada witnessed independence movement presence leaders ssh

ताज्या बातम्या