निवेदिता जोशी-सराफ यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कार

पुणे : गदिमा प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे.

संगीतकार कौशल इनामदार यांना चैत्रबन पुरस्कार तर, युवा गायिका रश्मी मोघे यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे १४ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार वितरणानंतर रश्मी मोघे आणि सहकारी गदिमा गीते सादर करणार आहेत, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी मंगळवारी दिली. प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि राम कोल्हटकर या वेळी उपस्थित होते.     

प्रतिष्ठानतर्फे दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण संपादन करणाऱ्या विद्याथ्र्यास गदिमा पारितोषिक दिले जाते. या वर्षी १३ विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर गुण प्राप्त केले आहेत. या सर्वांना त्यांची प्रमाणपत्रे घरपोच पाठविण्यात येणार असल्याचे आनंद माडगूळकर यांनी सांगितले.

गदिमांचे चरित्र लवकरच   

‘वाटेवरल्या सावल्या’ या पुस्तकातून ग. दि. माडगूळकर यांनी आत्मपर लेखन केले आहे. मात्र, हे लेखन त्रोटक स्वरूपातील असून त्यातून गदिमा पूर्णपणे उलगडत नाहीत. त्यामुळे युवा पिढीसाठी गदिमांचे सचित्र चरित्र सिद्ध करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला आहे. चांगल्या चरित्रलेखकाचा शोध घेऊन लवकरच हे चरित्र वाचकांच्या हाती सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती आनंद माडगूळकर यांनी दिली.