गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ पत्रकार-लेखक आणि माजी संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांना यंदाचा गदिमा 20sandip-khareपुरस्कार जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कवी संदीप खरे यांना चैत्रबन पुरस्कार जाहीर झाला असून पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या पत्नी स्मिता परांजपे यांना विद्याताई माडगूळकर स्मृती ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार जाहीर झाला असून युवा गायिका ऊर्मिला धनगर यांना ‘विद्या प्रज्ञा’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे गृहिणी-सखी-सचिव पुरस्काराचे स्वरूप असून पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे विद्या प्रज्ञा पुरस्काराचे स्वरूप आहे.
आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या ३७ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १४ 20smita-paranjapeडिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या वेळी शालान्त परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या जयवंत माध्यमिक विद्यालयाची (माजले, ता. हातकणंगले, जि, कोल्हापूर) विद्यार्थिनी नेहा शांतिनाथ पाटील हिला ‘गदिमा’ पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत. गदिमा आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचे देणे असलेल्या ‘गीतरामायणा’च्या हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून गदिमांच्या सर्व ७०० गीतांचा समावेश असलेल्या ‘एमपी थ्री’चे प्रकाशन होणार आहे. गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या एमपीथ्रीची निर्मिती केली आहे. उत्तरार्धात ‘माझी आवडती गदिमा गीते’ स्वरभास्कर पं. भीमसेन यांचे शिष्य उपेंद्र भट सादर करणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त श्रीधर माडगूळकर आणि आनंद माडगूळकर यांनी गुरुवारी दिली.