पुणे : कोथरूडमधील गुंड गजानन उर्फ गजा मारणेची पत्नी महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार आहे. मारणे याने काहींना दूरध्वनी केल्याची माहिती मिळाली आहे. मारणे याच्या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली आहे.

गजा मारणे याची पत्नी जयश्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोथरूड भागातून त्या निवडणूक लढवित आहेत. संगणक अभियंत्याला मारहाण प्रकरणात मारणे याला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. मारणेसह साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली होती. मारणे याला महापालिका निवडणुकीपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने त्याला अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला असून, त्याला शहरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

निवडणुकीत पत्नीला मदत करा, असे दूरध्वनी मारणेने कोथरूडमधील काही जणांना केले आहेत. आचारसंहितेचे पालन, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मारणेच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. मारणे याच्या दूरध्वनीमुळे मतदारांवर दबाव आहे, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार, त्यांच्या नातेवाइकांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. गजा मारणे याने काही जणांशी संपर्क साधल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.

पुण्यातील ६० उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्हे

पुणे शहरातील विविध पक्षांच्या ६० उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांची यादी तयार केली आहे. चारित्र्य पडताळणीसाठी (कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट) दोन हजार ६५० जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी दीड हजार जणांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पडताळणीत मिळाली आहे. यामध्ये आंदोलन किंवा किरकोळ राजकीय गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी ६० उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा उमेदवारांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे.