scorecardresearch

पुणे : गजा मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडलेकडून एकाला जीवे मारण्याची धमकी

कोथरूड भागातील गुंड गजानन मारणे याचा निकटचा साथीदार पप्पू कुडले याने व्याजाने दिलेल्या पैशांवरून एकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : गजा मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडलेकडून एकाला जीवे मारण्याची धमकी
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे : कोथरूड भागातील गुंड गजानन मारणे याचा निकटचा साथीदार पप्पू कुडले याने व्याजाने दिलेल्या पैशांवरून एकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुडले आणि साथीदारांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम, तसेच मारहाण करून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : पुण्यातील कोयता गँगची दहशत कोण मोडणार?

या प्रकरणी अतुल उर्फ पप्पू कुडले (रा. दत्तवाडी), बांदल, बालाजी उर्फ भैय्या कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष विष्णू लिंबोळे (वय ३८, रा. ओमसाई अपार्टमेंट, जुनी सांगवी) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लिंबोळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. त्या वेळी त्याची मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडले याच्याशी ओळख झाली होती. लिंबोळेला पैशांची गरज होती. त्याने कुडले याच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने कुडले याला मुद्दल आणि व्याजासह एकवीस लाख रुपये परत केले होते.

हेही वाचा – तरुण असे का वागतात? पुण्यात कोयता गॅंगच्या कहराच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञांनी दिली ‘ही’ माहिती

कुडले याने लिंबोळेकडे आणखी वीस लाख रुपये देण्याची मागणी केली होती. येरवड्यातील गुंजन टाॅकीज चौकात गुरुवारी (५ जानेवारी) रात्री पावणेबाराच्या सुमारास कुडले आणि त्याच्या साथीदारांनी लिंबोळेला बोलावून घेतले. लिंबोळे, त्याचे मित्र विशाल धुमाळ, कृष्णा अगरवाल आणि गौतम खुराणा यांना कुडलेने धमकावून त्याच्या मोटारीत बसवले. लिंबोळेला धमकावून ८२ हजार रुपये कुडलेने घेतले. त्यानंतर लिंबोळे आणि मित्राला मोटारीतून उतरण्यास सांगण्यात आले. ‘तू जर मला व्याजाचे पैसे दिले नाही तर आम्ही तुझा हात कापून टाकू,’ अशी धमकी देऊन कुडले पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक भगवान गुरव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 16:53 IST

संबंधित बातम्या