मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून निर्णायक ‘काटा स्पर्धा’ सुरू असताना खासदार गजानन बाबर यांनी मोक्याच्या क्षणी पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकसभेतील कामगिरीचा आढावा सादर करणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करवून घेतले. त्यातच, बाबरांना ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याने शहरभर त्यांची जाहिरातबाजी सुरू झाली आहे.
मुंबईत मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाबरांच्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले, तेव्हा लीलाधर डाके, डॉ. नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर, बबन पाटील, देवेंद्र साटम, श्रीरंग बारणे, सारंग कामतेकर आदी नेते उपस्थित होते. बाबर यांनी लोकसभेच्या कार्यकाळात ११२८ प्रश्न विचारले. त्यांची उपस्थिती ७३ टक्के असल्याचे तसेच विविध लोकोपयोगी कामे केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर, बाबर यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला, त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी बाबर समर्थक सरसावले असून शहरात जागोजागी फलक लावण्यात आले आहेत.