शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कनेते पदावर गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्यात आली असून बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी कीर्तिकर यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाची, तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे.
पुणे जिल्हा संपर्कनेत्या आणि पक्षाच्या प्रवक्त्या अशी दोन पदे सध्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहेत. नव्या रचनेनुसार पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी डॉ. गोऱ्हे यांच्याकडेच राहील, तर शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी कीर्तिकर यांच्याकडे राहील. बारामती तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे भाग पुणे व पिंपरी महापालिका क्षेत्रात येतात त्यांची जबबादारी कीर्तिकर यांच्याकडे येणार आहे.
 गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे जुन्या फळीतील नेते असून स्थानिय लोकाधिकार समितीची स्थापना झाली तेव्हापासून ते पक्षात सक्रिय आहेत. मराठी तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी जो लढा शिवसेनेने उभा केला त्यात कीर्तिकर यांचे मोठे योगदान राहिले. त्यातून त्यांचे नेतृत्व उदयाला आले. मुंबईतून १९९० मध्ये ते सर्वप्रथम विधानसभेवर निवडून गेले. ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते.