पुणे : पृथ्वीपासून १.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘टीकप’ नामक दीर्घिकेबाबत एक महत्त्वाचे गूढ उकलले आहे. या दीर्घिकेच्या केंद्रकात असलेल्या महाकाय कृष्णविवरातून निघणाऱ्या ‘जेट्स’मुळे (प्रखर झोत) त्या दीर्घिकेला आकार प्राप्त झाल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे.
स्पेनच्या खगोलशास्त्रज्ञ डॉ. ॲनिलिस ऑडिबर्ट आणि डॉ. क्रिस्टिना आल्मेडा यांच्यासह आंतरविद्यापीठीय खगोलशास्र आणि खगोलभौतिक केंद्रातील (आयुका) एम.मिनाक्षी आणि डॉ. दीपांजन मुखर्जी यांचा संशोधनात सहभाग आहे. चिली देशातील अटाकाम लार्ज मिलीमीटर अरे (अल्मा) दूर्बिणीच्या सहाय्याने केलेल्या या संशोधनाचा शोधनिबंध ‘द जर्नल ॲस्ट्रोनॉमी ॲन्ड ॲस्ट्रोफिजिक्स’मध्ये प्रसिद्ध झाले. या संशोधनाची माहिती आयुकाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
हेही वाचा – पुणे : बँकेत पैसे घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून ४७ लाखांची रोकड लंपास
हेही वाचा – हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी ३० दिवसांत १०० खांबांची उभारणी
सक्रिय दीर्घिकीय केंद्राच्या (ॲक्टिव्ह गॅलक्टिक न्यूक्लिया) वर्तनाचे नवे आकलन या संशोधनातून जगासमोर आले आहे. एखाद्या दीर्घिकेच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे भोवतालचे पदार्थच केंद्रकात लोटले जातात. त्यावेळी प्रचंड वस्तुमानामुळे प्रचंड वेगाने विद्युत चुंबकीय प्रारणे (जेट्स) उत्सर्जित होतात. या जेट्सला विश्वातील सर्वात तेजस्वी स्रोत मानले जाते. दीर्घिकेच्या निर्मितीमध्ये जेट्सची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. मध्यवर्ती कृष्णविवरातून बाहेर पडणाऱ्या रेडिओ जेट्समुळे दीर्घिकेतील पदार्थ बाहेर फेकले जातात. मात्र सर्वच रेडिओ जेट्समधून समान पद्धतीने पदार्थ बाहेर फेकले जात नाही. मात्र, ‘टीकप’ दीर्घिकेबद्दल वेगळे निष्कर्ष समोर आले. ‘लहान रेडिओ जेट्सचा फार काही परिणाम दीर्घिकेवर होत नसल्याचे आजवर मानले जात होते. शांत दिसणाऱ्या दीर्घिकेतही रेडिओ जेट्समुळे तारा निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. रेडिओ जेट्सच्या दोन्ही टोकांच्या दिशेने परिणाम होण्याऐवजी काटकोनात लंबकार परिणाम दिसत आहे, ही या संशोधनातील आश्चर्यकारक गोष्ट आहे,’ असे डॉ. क्रिस्टिना यांनी नमूद केले.