पुणे : गलगोटियास विद्यापीठ सध्या चर्चेत आहे, ते नवी दिल्लीतील कृत्रिम प्रज्ञा प्रभाव परिषदेत चिनी बनावटीचा ‘रोबोडॉग’ हे स्वत:चे नावीन्यपूर्ण उत्पादन ‘ओरायन’ आहे, असे सांगितल्याने ओढवलेल्या नामुष्कीमुळे. या माहितीमुळे विद्यापीठावरच नाही, तर भारताच्या ‘एआय’मधील विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले गेले. विद्यापीठाच्याच उत्कृष्टता केंद्राने ‘ओरायन’ची (रोबोडॉग) निर्मिती केल्याची माहिती ज्यांनी दिली, त्या गलगोटियास विद्यापीठाच्या नेहा सिंग याही यानिमित्ताने प्रकाशझोतात आल्या असून, ‘उत्साहाच्या भरात बोलले’, ‘माझ्या बोलण्याचा विपर्यास झाला’ अशी सारवासारव करण्याचा त्यांचा प्रयत्नही प्रसारमाध्यमांत गाजला. नंतर विद्यापीठानेच माफी मागून, या प्रतिनिधीला (नेहा सिंग) माध्यमांशी बोलण्याची अधिकृत परवानगीच नव्हती, त्यामुळे गोंधळ झाला, असे म्हटले.
वादानंतर नेहा सिंग काय म्हणाल्या?
‘माहिती देतानाचा माझा उत्साह गैरसमजाला कारणीभूत ठरला,’ असे त्यांचे म्हणणे. आजूबाजूला गर्दीचा माहोल होता. त्यात आपले विद्यापीठ कोणत्या नव्या गोष्टी करत आहे, त्याची माहिती देत असताना उत्साहाच्या भरात जे बोलले गेले, त्याने गैरसमज झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ‘रोबोटिक श्वान गलगोटियास विद्यापीठानेच तयार केले आहे, असे सांगण्याचा हेतू नव्हताच. ते उपकरण विद्यापीठात प्रदर्शनार्थ आणलेले आहे. विद्यार्थ्यांनी त्यापासून प्रेरणा घेऊन आणखी प्रगत साधन तयार करावे, असा उद्देश आहे,’ अशीही पुष्टी त्यांनी जोडली. पण, त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही विद्यापीठाचे हसे टळले नाही.
लिंक्ड-इनवरील ‘बायो’
या वादाच्या प्रसंगानंतर बुधवारी सायंकाळी उशिरा नेहा सिंग यांच्या ‘लिंक्ड-इन’ या समाज माध्यमावरील खात्यावर त्यांच्या छायाचित्राभोवती ‘ओपन टू वर्क’ असे ‘स्टेटस’ दिसत असल्याच्या बातम्यांनीही इंटरनेटवर धुमाकूळ घातला. सध्याची नोकरी वा प्रकल्प सोडून दुसऱ्या नोकरीत वा प्रकल्पावर काम करण्यास आपण तयार असल्याचे ‘लिंक्ड-इन’वरील सदस्यांना सांगण्यासाठी ‘ओपन टू वर्क’ हे स्टेटस ठेवले जाते. नेहा सिंग यांनी हे स्टेटस ठेवले असल्याच्या बातम्यांनंतर, ‘वादानंतर विद्यापीठाने त्यांची गच्छन्ती केली का’, की ‘त्याच आता विद्यापीठ सोडणार आहेत,’ असेही ‘ओपन टू वर्क’ स्टेटसचे अर्थ नेटकऱ्यांकडून काढले गेले. प्रत्यक्षात गुरुवारी सायंकाळी ‘लिंक्ड-इन’वरील खाते पाहिले असता, ‘ओपन टू वर्क’ हे स्टेटस आता नसल्याचे दिसते.
संवाद कौशल्याची चर्चा
नेहा सिंग यांनी त्यांच्या लिंक्ड-इनवरील वैयक्तिक माहितीत भाषेवरील हुकूमत आणि संवादातील ओघवतेवपणा ही आपली वैशिष्ट्ये असल्याचे म्हटले आहे. गलगोटियास विद्यापीठात त्या संज्ञापन विभागाच्या प्रमुख आहेत. याआधी त्यांनी शारदा विद्यापीठ, करिअर लॉन्चर, जीआयटीएएम अभिमत विद्यापीठ येथे काम केल्याचे त्यांचा ‘बायो’ सांगतो. ‘संवाद हे निव्वळ कौशल्य नाही, तर ओळख घडविणारी, आत्मविश्वास निर्माण करणारी आणि संधींची दारे उघडणारी ताकद आहे,’ असेही त्यात म्हटले आहे. नेहा सिंग यांच्याविषयीच्या समाजमाध्यमांवरील चर्चेत आता त्यांना या सगळ्याला सामोरे जावे लागले म्हणून खेद व्यक्त करणाऱ्या टिप्पण्याही येऊ लागल्या आहेत.
