अथर्वशीर्ष अभ्यासक्रमावर छगन भुजबळ यांची उपरोधिक टीका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमाध्ये अथर्वशीर्षाचा समावेश केला आहे. मग केवळ गणपतीच का, ३३ कोटी देव आहेत. त्यांनाही अभ्यासक्रमात घ्या, अशी उपरोधिक टीका करून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘कुठे घेऊन चाललो आपण शिक्षण’ असा सवाल सोमवारी उपस्थित केला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भुजबळ म्हणाले, ‘अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणतीही अभ्यास समिती अस्तित्त्वात नाही. अधिसभा अजून अस्तित्वामध्ये यायची आहे. प्रभारी कुलगुरुंना अभ्यासक्रम ठरविण्याचा अधिकार नाही. असे असताना खुशाल तुम्ही त्याला श्रेयांक देणार. आपण कुठे घेऊन चाललो आहे हे सगळे? सगळ्या धर्मात अशा काहीतरी गोष्टी असतील त्याही अशाच शिकवाव्या लागतील.

हेही वाचा >>> नवीन अभ्यासक्रमात महापुरुषांची चरित्रे; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

विज्ञान, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, माहिती-तंत्रज्ञान आता शिकायचे नाही का? यातून मन:शांती मिळणार आहे का? त्यासाठी प्राणायाम करा. योगा करा. प्रत्येकाने आपापल्या घरात ते करावे, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला. मंत्रालयात फुले दांपत्याच्या तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर भिडे वाड्याच्या प्रश्‍नाबाबतही लवकर बैठक घ्या, अशी मागणी सरकारकडे केली आहे. त्यावर एक महिन्यात ते काय निर्णय घेतील ते पाहू, अन्यथा आंदोलन तर आम्ही करणारच, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न बिकट होत चालले आहेत. त्या सगळ्यांना फाटा देण्यासाठी, त्यावर पांघरूण टाकण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. अपमानास्पद वाक्‍ये बोलून धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहे. त्यात जनतेला गुंतवून ठेवले जात आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला.

हेही वाचा >>> विद्यापीठ अधिसभेच्या प्राचार्य गटात पाच जागा बिनविरोध; उर्वरित पाच जागांसाठी मतदान

भाजपचे जे शीर्षस्थ नेते आहेत त्यांच्या मुला-मुलींनी मुस्लिम धर्मियांबरोबर लग्न केले. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. पण येथे मुद्दाम धार्मिक भावना चेतवण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबले जात आहेत. हिंदू-मुस्लिम लढाई सुरू झाली पाहिजे जेणेकरून त्यांना निवडणुकीला फायदा होईल, असेही भुजबळ यांनी नाशिक येथील लव्ह-जिहाद विषयावरील काढलेल्या मोर्चाबद्दल मत व्यक्त केले. मला परत जायचे आहे असे राज्यपाल अनेक दिवसांपासून म्हणत आहेत. परंतु, दिल्लीच्या लोकांनी त्यांना इथे ठेवले आहे. त्यांना हवे ते काम राज्यपाल चांगल्या पद्धतीने करू शकतात म्हणून त्यांना कदाचित ठेवले आहे, अशी उपरोधिक टिप्पमी भुजबळ यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganapati 33 crores dev syllabus chhagan bhujbal criticism pune print news ysh
First published on: 28-11-2022 at 17:13 IST