विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याद्वारे समाजाच्या घडणीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थांचे मोहोळ ही पुण्याची ओळख आहे. वक्तृत्वोत्तेजक संस्था, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था, वेदशास्त्रोत्तेजक संस्था, पुणे प्रार्थना समाज, पुणे भारत गायन समाज, गोपाळ गायन समाज, गांधर्व महाविद्यालय अशा संस्थांची वानगीदाखल नावे घेता येतील. यातील बहुतांश संस्थांनी शतकोत्तर परंपरा पार केली आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे या संस्था आपापल्या परीने योगदान देत असतात. गुढीपाडवा ते रामनवमी असे सलग नऊ दिवस गुरुसमवेत शिष्यांनी मिळून १००८ तास अखंड संवादिनी वादन करून संगीताची आराधना केली.
संवादिनी हे म्हटलं, तर गायन मैफलीत साथसंगत करणारे वाद्य. पण, या वाद्याची स्वतंत्र वादनाची क्षमता ध्यानात घेऊन रियाझ करण्यासाठी उद्युक्त करण्याचे काम गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने गेल्या चार दशकांपासून केले जात आहे. या वर्षीच्या मालेत इयत्ता चौथीमध्ये शिकणारी नारायणी लोहार हिच्यापासून ते ७७ वर्षांचे महादेव गाडगीळ असे विविध वयोगटातील ६० विद्यार्थी कलाकार यामध्ये सहभागी झाले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रसिद्ध संवादिनी वादक प्रमोद मराठे, परिणीता मराठे आणि नरेंद्र चिपळूणकर या गुरुंसमवेत विद्यालयात दररोज पहाटे सहा ते रात्री दहा या कालावधीत तर, रामनवमीच्या दिवशी पहाटे सहा ते रामजन्मापर्यंत म्हणजे दुपारी साडेबारापर्यंत संवादिनी वादनातून विद्यार्थ्यांनी रियाझ करण्याबरोबरच संगीताची आराधना केली. गुहागर येथील मयुरेश गाडगीळ या दृष्टिहीन युवकासह चिंचवड येथील हर्षवर्धन वाघमडे विद्यालयामध्येच वास्तव्यास होता. मराठी नववर्षासाठी अमेरिकेतून पुण्यात आलेल्या वर्षा फडके आणि देवेन वहाणे, तर सिंगापूर येथून पुण्यात आलेले सचिन वर्तक या स्वरयज्ञामध्ये सहभागी झाले होते. सहभागी बहुतांश विद्यार्थ्यांनी किमान शंभर तासांचे संवादिनी वादन केले.
‘चार दशकांपूर्वी म्हणजे १९८६ मध्ये अजित पळशीकर आणि गिरीश दाते या तबलावादक मित्रांसमवेत मी हा उपक्रम सुरू केला होता. त्या वेळी केवळ रामनवमीच्या आदल्या दिवसापासून ते रामजन्माच्या वेळेपर्यंत २४ तासांचा संवादिनी वादनाचा रियाज केला जात असे. ज्येष्ठ गायिका डाॅ. वीणा सहस्रबुद्धे यांनी काही वर्षे भजन सादरीकरणाच्या माध्यमातून यामध्ये सहभाग घेतला. गेल्या दोन दशकांपासून विद्यार्थी संख्येची भर पडल्यानंतर संवादिनी वाजनाच्या रियाझाचा हा स्वरयज्ञ गुढीपाडवा ते रामनवमी असा करण्यात आला आहे. या उपक्रमामागची भावना आणि त्याचे पावित्र्य जपत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग तर घेतातच. पण, आपले वादन परिपूर्णतेच्या दिशेने कसे जाईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यासाठी धडपडतात,’ अशी माहिती प्रमोद मराठे यांनी दिली. गुढीपाडव्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम म्हणजे संगीत साधनेची अपूर्व संधी देणारी एक प्रकारे चळवळ झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सांगीतिक संस्थांचा गौरव
गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेली पुणे भारत गायन समाज आणि गोपाळ गायन समाज या संगीत क्षेत्रात शतकोत्तर परंपरा लाभलेल्या प्रतिष्ठित संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. वि. रा. उर्फ बापूसाहेब परांजपे आणि कमलाबाई परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र विष्णू परांजपे आणि रमा परांजपे यांनी या संस्थांचा सन्मान करताना दोन्ही संस्थांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य केले. सारसबागेतील पेशवे सभागृहात झालेल्या कार्यक्रमास श्री देवदेवेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश भागवत, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, अधिश पायगुडे आणि डाॅ. राधिका परांजपे या वेळी उपस्थित होत्या. पुणे भारत गायन समाज संस्थेच्या वतीने अध्यक्षा शैला दातार, शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार तर, गोपाळ गायन समाजाच्या वतीने डाॅ. विकास कशाळकर, राधिका जोगळेकर यांनी धनादेश स्वीकारला.
‘माझे वडील भारत गायन समाज येथे आणि आई गोपाळ गायन समाज येथे जात असे. बालगंधर्व यांचे पुण्यात आमच्या घरी मुक्कामी येत असत. अनेक गायक यानिमित्ताने घरी येत होते. त्यामुळे संगीत क्षेत्राशी आमची जवळीक होती. नव्या पिढीला घडविण्याचे काम करणाऱ्या संस्थांना छोटी मदत करता आली हे भाग्य आहे,’ अशी भावना परांजपे यांनी व्यक्त केली.
vidyadhar.kulkarni@expressindia.com
