गायन, वादन आणि नृत्य अशी संगीताची प्रामुख्याने तीन महत्त्वाची अंगे आहेत. अभिजात संगीताच्या गायनामध्ये संवादिनी, तानपुरा, तबला ही वाद्ये प्रामुख्याने कलाकाराच्या प्रस्तुतीमध्ये रंग भरतात. अभंग आणि भजन प्रस्तुतीमध्ये पखवाज अनिवार्यच असतो. सुगम संगीत असो, वा लोकप्रिय हिंदी-मराठी चित्रपटगीत; त्यामध्ये संगतकारांच्या वाद्यवादनातून त्या गीताची खुमारी वाढते. सतारवादनाचे गौरीशंकर पं. रविशंकर, ‘गूँज उठी शहनाई’मधील उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे सनईवादन, उस्ताद अल्लारखाँ आणि उस्ताद झाकीर हुसेन या पिता-पुत्राचे आनंददायी तबलावादन अशी अनेक कलाकारांची उदाहरणे देता येतील, की ज्यांनी चित्रपटसंगीतामध्येही आपली नाममुद्रा ठळकपणे प्रस्थापित केली. काश्मिरी संतूरला लोकप्रियता मिळवून देणारे पं. शिवकुमार शर्मा आणि ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांचा यश चोप्रा यांच्यासाठी ‘शिव-हरी’ नावाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एकत्रित वाटचालीचा ‘सिलसिला’ सुरू झाला. अशी संगतकारांची जादू रसिकांना मोहवून टाकते.
संगतकारांच्या वाद्यवादनाची जादू अनुभवण्याची संधी बुधवारपासून (६ मे) तीन दिवस रसिकांना लाभणार आहे. गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात पंधराहून अधिक वाद्यांच्या वादनातून २५ कलाकार लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना ‘स्वरांजली’ अर्पण करणार आहेत. मराठी-हिंदी चित्रपट गीतांबरोबरच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत, गज़ल असे विविध संगीतप्रकार ऐकावयास मिळणार आहे. सुगम संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल रमाकांत परांजपे, श्यामकांत परांजपे, विवेक परांजपे यांना पं. विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव पुरस्कार आणि सचिन जांभेकर यांना पं. तुळशीदास बोरकर स्मृती संगतकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मुग्धा सरदेशपांडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्यवादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे, अशी माहिती प्राचार्य प्रमोद मराठे यांनी दिली.
सनईच्या मंगल सुरांनी सुरुवात करण्याच्या परंपरेचे पालन करत डॉ. प्रमोद गायकवाड यांच्या सनईवादनाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर संजय भावे (सॅक्सोफोन), संजय गोगटे (ऑर्गन), सौरभ वर्तक (बासरी), सचिन जांभेकर (संवादिनी), अनिल गोडे (ॲकॉर्डियन), शंतनू गोखले (संतूर), अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन), साक्षी शेवलीकर (मोहनवीणा), अनिल पेंडसे (मेंडोलिन), मिलिंद तुळणकर (जलतरंग), स्वप्ना दातार (व्हायोलिन), श्यामकांत सुतार (माउथ ऑर्गन), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), विजय तुळसकर (सिंथेसायझर/संवादिनी), अमर ओक (बासरी), कल्याणी देशपांडे (सतार), दीप्ती कुलकर्णी (पियानिका), प्रमोद मराठे (संवादिनी) यांचे सादरीकरण होणार आहे. रमाकांत परांजपे (व्हायोलिन), श्यामकांत परांजपे (विविध वाद्ये) आणि विवेक परांजपे (सिंथेसायझर) यांचे सादरीकरण आणि संवादात्मक कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होणार असून, त्यांच्याशी संगीतकार पराग माटेगावकर संवाद साधणार आहेत.
ॲकाॅर्डियनच्या सुरांची जादू
‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘आजा सनम मधुर चांदनी में हम’, ‘बाबूजी धीरे चलना’ आणि ‘आईये मेहेरबान’ यांसारख्या ॲकॉर्डियनच्या सुरांनी सजलेल्या अजरामर गीतांनी ‘ॲन इव्हिनिंग विथ ॲकॉर्डियन’ या कार्यक्रमात रसिकांना मंत्रमुग्ध केले. अमित वैद्य यांनी आपल्या वादनातून या गाण्यांतील खास सुरावटीद्वारे प्रेक्षकांना हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात नेले. ज्येष्ठ अभिनेते राज कपूर, ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी आणि ओ. पी. नय्यर (२०२६) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा कार्यक्रम त्यांना समर्पित करण्यात आला होता. अमित वैद्य यांनी ‘ए दिल कहाँ तेरी मंजिल’ या गाण्याची मुख्य धून सादर केली, तर त्यांची पत्नी केतकी वैद्य यांनी आपल्या आवाजातून पार्श्वसंगीत साकारत कॉन्ट्रा मेलडीची प्रभावी अनुभूती प्रेक्षकांना दिली. अमित वैद्य यांना पद्माकर गुजर (ढोलक) आणि विनोद सोनवणे (ऑक्टोपॅड) यांनी सुरेल साथसंगत केली. सुहास किर्लोस्कर यांनी निवेदन केले.
vidyadhar.kulkarni@expressindia.com
