पुणे : गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांना यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बारा दिवस भक्तिरसामध्ये लीन होता येणार आहे. हरतालिका आणि गणेश चतुर्थी (१४ सप्टेंबर) एकाच दिवशी असून, हरतालिकापूजनानंतर गणरायाची प्रतिष्ठापना करता येणार आहे.

‘सोमवारी, भारतात सर्वत्र गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्हानंतरदेखील करता येऊ शकते. १४ सप्टेंबर रोजी पंचांगामध्ये हरतालिका तृतीया व गणेश चतुर्थी एकाच दिवशी दिलेली आहे. या दिवशी तृतीया समाप्ती सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी आहे. हरतालिका तृतीयेसाठी सूर्योदयव्यापिनी तृतीया आवश्यक असते, तर गणेश चतुर्थीकरिता चतुर्थी तिथी मध्यान्ह कालव्यापिनी असावी लागते. १४ सप्टेंबर रोजी सूर्योदयकाली तृतीया व मध्यान्ही चतुर्थी असल्याने ही दोन्हीही व्रते एकाच दिवशी आलेली आहेत,’ अशी माहिती ‘दाते पंचागकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली.

दाते म्हणाले, ‘तिथीचे सूर्योदयकाली असणे, मध्यान्हकाली असणे इत्यादी नियम व्रताच्या दिननिश्चितीकरिता आहेत. व्रतकर्त्याने त्या कालावधीतच पूजन करावे, असे अभिप्रेत नसते. त्यामुळे १४ सप्टेंबर रोजी तृतीया समाप्तीपर्यंतच हरतालिका पूजन करावे किंवा त्यानंतरच गणेशपूजन करावे असे नसून, तृतीया समाप्तीपूर्वी अथवा समाप्ती झाल्यानंतरही हरतालिका पूजन करता येईल. तसेच, ७ वाजून ७ मिनिटांपूर्वी गणेश चतुर्थीनिमित्त पार्थिव गणेशपूजन करता येईल. या दिवशी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही आणि दोन्हीही व्रतांचे कर्ते भिन्न असल्याने कोणतीही पूजा आधी अथवा नंतर करता येईल,’ अशी माहिती ‘दाते पंचागकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली.

दाते म्हणाले, ‘प्रथेप्रमाणे गणेशोत्सव काही जणांकडे दीड, ३, ५, ७ दिवस, तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस गणेशाची रोज सकाळी व संध्याकाळी पूजा, आरती अवश्य करावी. काही जणांकडे गौरीबरोबर गणपती विसर्जन करण्याची परंपरा असते, अशा वेळी तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार असताना त्या दिवशी विसर्जन करता येते. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना केलेल्या पार्थिव गणेश मूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे असे धर्मशास्त्र सांगते. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून, पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा कृत्रिम हौदामध्ये, तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी.’

या वर्षी २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून १२ वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते त्यांच्याकडे या वर्षी १२ दिवस उत्सव असेल. विसर्जनाच्या वेळेस ‘मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या’ अशा आरोळ्या देणाऱ्या आपल्या सर्वांच्या आग्रहाचा मान ठेवून पुढच्या वर्षी गणपती खरंच लवकर म्हणजे ४ सप्टेंबर रोजी येणार आहेत, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

हरतालिकेचा उपवास दिवसभर असतो, हा उपवास दुसऱ्या दिवशी दिनांक १५ सप्टेंबर रोजी मंगळवारी सोडावा. तसेच, ज्यांना ऋषिपंचमीचादेखील उपवास आहे, त्यांनी १५ सप्टेंबर रोजी सकाळी हरतालिकेची उत्तरपूजा करून त्यांचे विसर्जन करावे. त्यानंतर भाताच्या एका घासाचा वास घेऊन हरतालिकेचा उपवास सोडावा आणि मंगळवारी ऋषिपंचमीचा उपवास नेहमीप्रमाणे करावा. यापूर्वी २००६, २००९ मध्ये हरतालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेले होते. तसेच २०१७ मध्ये १२ दिवसांचा गणेशोत्सव आलेला होता. – मोहन दाते, दाते पंचांगकर्ते